
योगश पाटील । हिंगोली
कळमनुरी तालुक्यातील कोंढुर ते पार्डी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेच्या वतीने 23 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर यांच्या पुढाकारातुन नागरिकांनी भजन आंदोलन केले. या आंदोलनामुळे हादरलेल्या प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने पंधरा दिवसाच्या आत कामाला सुरुवात करु, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, आश्वासन पाळले नाही तर पंधरा दिवसांनी नांदेड ते अकोला रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाळासाहेब मगर यांनी दिला.
पार्डी, कोंढुर, डिग्रस या रस्त्याच्या कामाची निविदा देण्यात आली आहे. मात्र, रस्ता दुरुस्तीचे काम कंत्राटदाराकडुन केले जात नसल्यामुळे नागरिकांना रहदारीसाठी अडचण निर्माण होत आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुनही काम सुरु न झाल्याने अखेर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, राम कदम, पं.स. उपसभापती गोपु पाटील, भानुदास जाधव, नंदकिशोर खिल्लारे, जेष्ठ नेते उत्तमराव मगर, कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर चांगलाच दणाणुन गेला होता. कळमनुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी हे काम पंधरा दिवसात सुरु करण्यात येईल, असे लेखी आश्वासन आंदोलन स्थळी येऊन दिले. दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करुन पंधरा दिवसात प्रत्यक्षात काम सुरु झाले नाही तर नांदेड ते अकोला रस्त्यावरील पार्डी मोड येथे रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा ईशारा मगर यांनी सा.बां.च्या अधिकाऱ्यांना दिला. या आंदोलनात पं.स.सदस्य बाळासाहेब पतंगे, ग्यानबाराव पतंगे, रुपेश पतंगे, राजेश्वर पतंगे, केशव पतंगे, तुकाराम मस्के यांच्यासह पार्डी, सिंदगी, कोंढूर येथील महिला व नागरिक सहभागी झाले होते.



























































