
कोरोनाच्या संकटात गणपती बाप्पा अन् भक्तांचे पारंपरिक नाते अतूट राखण्यासाठी शिवसेनेने विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात अभिनक उपक्रम राबवला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गणेशभक्तांनी घरीच राहावे, यासाठी विलेपार्ले परिसरात घरोघरी बाप्पाच्या पूजेचे साहित्य विनामूल्य वितरित केले जाणार आहे. ‘सुरक्षित राहा, गर्दी टाळा’ असा विधायक संदेश या उपक्रमातून भक्तांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
राज्याचे परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला विधानसभा संघटक रुपाली शिंदे, महिला शाखा संघटक अपर्णा उतेकर, प्रकाश सकपाळ, सुमीत तळवळकर, आनंद पाठक, हर्षाली बेलवलकर, हंसराज गुप्ता आदी उपस्थित होते. उपक्रमांतर्गत विलेपार्ले आणि अंधेरी परिसरातील घरांमध्ये गणरायाच्या पूजेचे साहित्य असलेल्या बॉक्सचे वाटप करण्यात येणार आहे. शिवसेना शाखा क्रमांक 84 ने उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना महामारीमुळे यंदा राज्यात साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भक्तांनी पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गर्दी करू नये, या हेतूने आम्ही विलेपार्ले परिसरात घरोघरी पूजेच्या साहित्याचे वाटप करणार आहोत, असे आयोजक तथा शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी सांगितले.























































