
‘आयएनएस विक्रांत युद्धनौके’च्या नावाखाली भाजपचे किरीट सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांच्या केलेल्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आज राज्यभरात सोमय्यांनी केलेल्या देशद्रोहाविरुद्ध उद्रेक उसळला. देशाच्या सुरक्षेची, राष्ट्रीय भावनेची फसवणूक करणाऱया किरीट सोमय्या यांना अटक करा या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका उडाला. ‘भाजप हमसे डरती है… ईडी को आगे करती है’, ‘गली, गली मे शोर है, किरीट सोमय्या चोर है’, ‘अटक करा, अटक करा, देशाशी गद्दारी करणाऱया सोमय्यांना अटक करा’ अशा घोषणा देत तळपत्या उन्हात जनता रस्त्यावर उतरली. कुठे जोडे मारो आंदोलन, तर कुठे सोमय्यांच्या पुतळ्याची धिंड काढून त्याचे दहन करीत देशद्रोहाविरोधात आपला संताप व्यक्त करण्यात आला.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची ‘विक्रांत फाइल’ ओपन केली. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या सुमारे 100 कोटी रुपयांचे झाले काय असा सवाल करीत राज्यपाल कार्यालयाचे पत्रच जनतेसमोर आणले. 1971च्या पाकिस्तानविरोधातील युद्धातील शौर्याची साक्षीदार असलेल्या विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली सोमय्यांनी केलेला हा अपहार प्रसार माध्यमांसमोर आल्यानंतर सर्वसामान्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. याचाच परिणाम म्हणून आज महाराष्ट्रभरातील जनता रस्त्यावर उतरली आणि सोमय्यांच्या अटकेसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, बीड, परभणीसह शिवसेनेने आज राज्यभरात जोरदार आंदोलन केले. नाशिकमध्ये सोमय्यांचा पुतळा जाळण्यात आला तर परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
मुंबईत नाक्यानाक्यांवर निदर्शने
मुंबईत किरीट सोमय्यांविरोधात नाक्यानाक्यांवर निदर्शने करण्यात आली. देशद्रोही सोमय्यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली. वरळी, चेंबूर, कुलाबा, दादर, भांडूप यासह मुंबईभर रॅली काढून सर्व सामान्य जनता तसेच शिवसैनिकांनी सोमय्याविरोधातील फलक झळकावत आंदोलन केले.
शिवसेना भवन
विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवन परिसरात निदर्शने केली. यावेळी विभाग संघटक नगरसेविका श्रद्धा जाधव, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले.
बोरिवली
ओमकारेश्वर मंदिर चौक, नॅशनल पार्कसमोर, बोरिवली (पू) येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, नगरसेवक संध्या दोशी, सुजाता पाटेकर, रिद्धी खुरसुंगे, माधुरी भोईर, उपविभागप्रमुख विनायक सामंत, पांडुरंग देसाई, दामोदर म्हात्रे, चेतन कदम आदी उपस्थित होते.
वरळी
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग 11 च्या वतीने वरळी नाका येथे शिवसेना उपनेते सचिन अहिर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार अजय चौधरी, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडूदादा सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करून सोमय्यांच्या अटकेची मागणी केली.
चेंबूर
विभागप्रमुख मंगेश सातमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर शिवसेना शाखा क्रमांक 152 शाखेसमोर मध्यवर्ती कार्यालय येथे सोमय्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नगरसेविका अंजली नाईक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कांदिवली
विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली स्टेशन सरोवर हॉटेलसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी किरिट सोमय्यांविरोधात जोरदार घोषणा करण्यात आल्या. आंदोलनात विधानसभा संघटक संतोष राणे, कमलेश यादव, संतोष धनावडे, नंदू मोरो, अनिल भोपी, राजू खान आदी सहभागी होते.
गोरेगाव
गोरेगाव रेल्वे स्थानक पूर्व येथे विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
घाटकोपर
विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी विभाग संघटक भारती बावदाने, उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, बाबू दरेकर, हेमांगी साळवी आदी उपस्थित होते.

































































