शिवसेनेचे झंझावाती वादळ कोणी रोखू शकत नाही -शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रात किंवा राज्यात कोणाचीही सत्ता असो, शिवसेनेचे झंझावाती वादळ कोणी रोखू शकत नाही, असा ठाम विश्वास शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्गात शिवसेनेचा भगवा झंझावात यापुढेही सुरूच राहील. आमदार वैभव नाईक जनतेचे आमदार आहेत. मतदार संघातील गावागावात जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणूकीत वैभव नाईक हॅट्रिक करणारच. मात्र त्यांच्यासमोर कोणाला उभे करणार ? स्वतः निवडणूकी रिंगणात उतरणार की मागील वेळेप्रमाणे रणजित देसाई यांच्या सारख्या कार्यकर्त्याचा राजकीय बळी देणार. हे निलेश राणे यांनी जाहीर करावे. आम्ही शिवसैनिक सज्ज आहोत, असा विश्वास हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केलं.

मालवण शिवसेना शाखेत हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर सोमवारी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, मंदार केणी, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, अमेय देसाई, प्रसाद मोरजकर, उपशहर प्रमुख किसन मांजरेकर, यशवंत गावकर, दशरथ कवटकर, बंड्या सरमळकर, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

आमदार वैभव नाईक यांनी शहरात केलेल्या विकास कामांचे गुणगान करण्याचे काम निलेश राणे यांनी मालवण पालिकेत केले. निलेश राणे सातत्याने नगरपालिकेत येत राहिले, तर आम्हाला आमच्या कामाची प्रसिद्धी करण्याची गरज राहणार नाही, असा टोला खोबरेकर यांनी लगावला. त्यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे आजपर्यंत जेवढा निधी नगरपालिकेसाठी आणू शकले नाहीत, तेवढा निधी आमदार असलेल्या वैभव नाईक यांनी गेल्या काही वर्षात आणून दाखवला.

2005, 2009, 2014 मध्ये नारायण राणे सत्तेतील मंत्री, पालकमंत्री होते. त्यावेळी वैभव नाईक डगमगले नाहीत. मग आता तुमची सत्ता असली तरी तुमच्या धमक्यांना आमदार वैभव नाईक व शिवसैनिक घाबरणार नाही. एखादा अधिकारी चुकीचा असेल तर त्याला जाब विचारण्यासाठी कोणीही शिवसैनिक मागे हटणार नाही.

निलेश राणे यांनी नगरपालिकेला भेट देत केंद्रातून आणलेला निधी खर्च का झाला नाही, हे विचारले असते तर ठीक होते. पण वैभव नाईक यांनीच आणलेल्या निधीबाबत प्रश्न करून वैभव नाईक यांची कार्यक्षमता त्यांनी स्वतः सिद्ध केली आहे, असे हरी खोबरेकर म्हणाले. शहरातील रस्त्याची कामे अपूर्ण असल्याचे निलेश राणे आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र जवळपास शहरात 50 लाखांची कामे देवदत्त सामंत नामक ठेकेदाराने भरली आहेत. ही कामे त्याने अपूर्ण ठेवली असून देवदत्त सामंत कोणाच्या पक्षाचे आहेत आणि त्यांना जाब विचारण्याची हिंमत निलेश राणे दाखवणार का, असा सवाल हरी खोबरेकर यांनी केला.

शहरातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम रखडले आहे. मात्र हे काम कोणी अडवले ? त्या संस्थेवर कोणत्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, हे सांगावे. शहरातील गटार खोदाईचे पोटठेकेदार कोण ? ही माहिती निलेश राणे यांनी स्वतःच्या पक्षाच्या माजी नगरसेवकांकडून घ्यावी, असेही खोबरेकर म्हणाले.

2014 नंतर शिवसैनिकांनी निलेश राणेंचा दोनवेळा पराभव केला, त्यांच्या वडिलांचा पराभव केला. त्यामुळे वैभव नाईक हे आमसभेचे नाहीत तर आम जनतेचे आमदार आहेत. निलेश राणे मतदार संघात आता फिरतात. तुम्ही मुख्याधिकाऱ्यांवर आगपाखड केली, पण तुमची पाठ फिरताच त्याच मुख्याधिकाऱ्यांच्या पाठीवर हात कोणी फिरवला, ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या सहकाऱ्यांना विचारावे. तुम्हाला चुकीची माहिती देत तुमचेच नगरसेवक तुमची दिशाभूल करीत आहेत. नगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे पोकळ आरोप करण्यापेक्षा ते सिद्ध करा. मागील 5 वर्षात शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि सभापतींनी उत्तमरीत्या काम केले आहे. पालिकेत जनतेला अपेक्षित असलेली विकास कामे केली. शिवसेनेच्या सत्ताकाळात इमारत बांधणीसाठी कोणाला परवानगी मिळवताना त्रास झाला नाही. त्यामुळे निलेश राणेंनी शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करू नये, असे हरी खोबरेकर म्हणाले.

सुदेश आचरेकर आता टीका करण्यास सरसारवले – माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर
गटार खोदाई योग्य पध्दतीने होत नाही हे सांगायला सुदेश आचरेकर दीड महिन्यांनी पुढे आले. यात मेख काय आहे? हे निलेश राणे यांनी ओळखले पाहिजे. पाच वर्षात जनहिताची कामे झाली. चुकीचे काम, अर्धवट काम ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली. फौजदारी गुन्हे दाखल केले. हा सगळा कारभार आचरेकर आमच्या केबिनमध्ये बसून पाहत होते. हेच आचरेकर आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवत टीका करत आहेत. मात्र राजकीय परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. असा टोला महेश कांदळगावकर यांनी लगावला.