खोके सरकार बिल्डरांची हांजीहांजी करणं सोडून जनतेची सेवा कधी करणार ? – आदित्य ठाकरे

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाच्या उद्धाटनावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला व महापालिका आयुक्तांना ट्विटरवरून फटकारल्यानंतर तातडीने या पूलाच्या उद्घाटनाचा घाट घातल्याचे समजते आहे. या पूलाचे उद्घाटने सोमवारी 26 फेब्रुवारी पालकमंत्र्यांचे हस्ते होणार असल्याची चर्चा आहे.

आदित्य ठाकरे यांच्या ट्विट आधी विविध कारणे देणाऱ्या सरकारने बारा तासांच्या आत युटर्न घेत पूलाचे उद्घाटन करणार असल्याचे सांगितले. याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा राज्य सरकार व महापालिका आयुक्तांवर निशाणा साधला आहे. हे खोके सरकारचे व्हीआयपी बिल्डर आणि कंत्राटदारांची हांजीहांजी सोडून, जनतेची सेवा करण्यावर कधी भर देणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केला आहे.

”उशिरा होत असलेल्या आणि अर्धवट तयार झालेल्या गोखले पुलाच्या उद्घाटनाचा मुद्दा आम्ही उपस्थित केल्यानंतर, आता म्हणे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचं समजतय. आमचा दबाव कामी आला ह्याचा आनंद आहेच, पण प्रश्न असा आहे की 5 दिवसांपूर्वीच काम झालेलं असतानाही मुंबईकरांनी उद्यापर्यंत तरी का थांबावं? तसंच… जे आमदार खोटं बोलले होते की ‘मॅस्टिक वर्क’ बाकी आहे आणि महानगरपालिका आयुक्त खोटं बोलत होते की लोड टेस्टिंग बाकी आहे, त्याचं काय झालं? मी केलेल्या ट्विटनंतर 12 तासांच्या आतच सगळं काम पूर्ण झालं?”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

या ट्विटमधून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारने थांबवून ठेवलेल्या काही उद्घाटनांवरूनही सरकारला फटकारले आहे. ””देशांतर्गत विमानतळाजवळच्या पुलाचं उद्घाटन कधी होणार?त्याचप्रमाणे पुण्यात, रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो तयार आहे आणि एक महिन्यापासून उद्घाटनाच्या तारखेची वाट पाहते आहे. विमानतळाचे टर्मिनल 2 गेल्या 6 महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.खोके सरकारचे व्हीआयपी बिल्डर आणि कंत्राटदारांची हांजीहांजी सोडून, जनतेची सेवा करण्यावर कधी भर देणार?”असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.