दारव्हा तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचे धडक आंदोलन

>> प्रसाद नायगावकर

शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात पिक विमा काढला. तरीही अद्यापपर्यंत असंख्य शेतकऱ्यांना नुकसानीचा पिक विमा मिळाला नाही. तसेच काही शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजा पिक विमा मंजूर करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटांनी त्रस्त झालेल्या बळीराजावर सरकारने आणि पीक विमा कंपनीने वाऱ्यावर सोडल्याची दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी आणि नुकसानाची माहिती घेण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दारव्हा तालुक्याच्या वतीने कृषी अधिकारी कार्यालयात धडक आंदोलन करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी तथा विमा कंपनीचे तालुका समन्वयक यांना किती शेतकऱ्यांनी विमा भरला, किती शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला, किती शेतकरी अपात्र ठरले तसेच पिक विमा मंजूर करताना कोणते निकष लावण्यात आले याची तपशीलवार माहिती मागितली. मात्र, तालुका कृषी अधिकारी तथा विमा कंपनीचे तालुका समन्वयक यांच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसल्याने त्यांनी हात वर केले. यामुळे संतप्त शेतकरी बांधवांचे समाधान अधिकाऱ्यांना करता आले नाही. सरतेशेवटी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर मागितले. त्यावर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी माहिती उपलब्ध नाही असे लेखी पत्र लिहून दिले.

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्यापपर्यंत नुकसानीचा पूर्ण सर्व्हे करण्यात आला नाही.तो सर्व्हे ताबडतोब करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करण्यात आली. तसेच शेकडो शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ अत्यल्प रक्कम जमा करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांची फसवणून झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. पिक विमा कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा कलम 420 नुसार दाखल करण्यात यावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, यासाठी पोलीस निरीक्षक दारव्हा यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या आठ दिवसांत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी अजय गाडगे तालुका प्रमुख, अमोल दुधे शहर प्रमुख, रवी तरटे माजी नगरसेवक, सुधाकर पिंगाणे तालुका संघटक, गोपाल भोयर युवासेना तालुका प्रमुख, शंकर नागलवाडे उप तालुका संघटक,उप तालुका प्रमुख रामहरी लोखंडे, प्रशांत भोगे, रामेश्वर गिरी,प्रशांत तुळजापूरे युवासेना विधानसभा समन्वयक, लखन मानकर युवासेना विधानसभा सचिव , जयश्रीताई मिरासे,वहिद खासाब तालुका प्रमुख अल्पसंख्याक आघाडी,मो.दानिश शहर प्रमुख, विजय डांगरा शहर संघटक, साजुसिंग जाधव, रामा लोंढे,विलास राठोड, गोपाल गायकवाड, दिनेश मैंद,क्रिष्णा निंबर्ते, अनिल महाराज जामगडे, रवी ठाकरे, सुरेश चतुर, सचिन जवके,शेख अब्बास, सुभाष गायकवाड, सदाशिव बांडे, बाबुलाल चव्हाण, दुष्यंत पवार,सुरज शिंदे, आशिष उघडे, शेषराव राठोड, कैलास कतले , देवराव सरतापे, अनिल देशमुख, विकास राठोड यांच्या सह शेकडो शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तथा शेकडो शेतकरी उपस्थित होते.