जुन्या योजनांनाच पंतप्रधानांच्या नावाची ठिगळं, अंबादास दानवे यांनी केली मिंधे सरकारची पोलखोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात 11 योजनांची घोषणा केला. आधीच राज्यात लागू असलेल्या जुन्या योजनांची नव्या नावाने पुन्हा घोषणा करण्यात आल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी ट्विटरवरून या जुन्या योजनांची यादीच दिली आहे.

”काल छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी 11 योजनांची घोषणा केली. ज्या योजना अगोदरच राज्यात कार्यान्वित आहेत, त्याच योजनांना ‘नमो’ हे पंतप्रधान मोदींच्या नावाचे ठिगळ लावले आहे. ‘आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे’ म्हणून एकीकडे मिरवायचं आणि दुसरीकडे ही असली ठिगळे लावायची. बघा या घोषित योजना आणि सध्या त्याच सुरु असलेल्या नावांची जंत्री. 1. नमो महिला सशक्तीकरण अभियान (आत्ताचे) – यापूर्वीच प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून नव्याने घोषित लाभ देण्यात येत आहेत. 2. नमो कामगार कल्याण अभियान – सन 2019 पासूनच कामगारांना सुरक्षा संच उपलब्ध करून देणारी अशी योजना अस्तित्वात आहे, राबवली जात आहे. 3. नमो शेततळे अभियान – मग ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना काय आहे, हे मुख्यमंत्री, सुपर सीएम सांगतील का? 4. नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान – मग कुसुम, सौभाग्य योजनेतुन सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यात येत होते. मग आता फक्त नाव बदलून काय साध्य होणार? 5. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान – आता राज्यात अस्तित्वात असलेली दिलीत वस्ती सुधार योजना, रमाई घरकुल काय करते, जे आता नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजनेच्या नावाखाली केले जाणार आहे. 6. नमो ग्राम सचिवालय अभियान – फास्ट इंटरनेटसाठी ही घोषणा केलीत, मग डिजिटल इंडिया ही योजना काय आहे? 7. नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान – समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून अगोदरच हे काम राज्यात सुरु आहे. 8. नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान – यापूर्वी गडकिल्ले संवर्धन आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी योजना अस्तित्वात आहेतच की. अजून 3 योजना आहेत ज्यात फक्त खुशामतीचा भाग म्हणून त्यावर पंतप्रधानांच्या नावाचे ठिगळ लावले आहे. दिल्लीश्वरांना कितीही बढाया मारा, ते खुश होतील. इथे सगळं स्पष्ट दिसतं. ‘आपण फक्त बोलून निघून जायचे’, या विचारातून या 11 योजनांचे पुन्हा बारसे झाले आहे” अशी टीका करत अंबादास दानवे यांनी मिंधे सरकारची पोलखोल केली आहे.