
वडाळा डेपो परिसरात मोनोरेलच्या गाडीला अपघात झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक बनलेल्या मोनोरेलची सेवा बंद करा आणि या मार्गावर बेस्टची सुरक्षित बससेवा सुरू करा, अशी आग्रही मागणी शिवसेना आणि मनसेतर्फे करण्यात आली.
मोनोरेल मार्गिकेखालील रस्त्यावरून प्रतीक्षानगर, चुनाभट्टी, वडाळा, चेंबूरला ये-जा करणाऱया वाहनांची वर्दळ सुरू असते. त्या वाहनांमधून प्रवास करणारे प्रवासी, स्थानिक नागरिक आणि मोनोरेलचे प्रवासी या सर्वांना मोनोरेलच्या सदोष सेवेचा धोका संभावत आहे. त्याकडे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. याच पार्श्वभूमीवर अपघाताबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या महिला विभागप्रमुख पद्मावती शिंदे, विभाग संघटक गजानन पाटील, उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले, वाहतूक सेनेचे विशाल आमकर, युवती शाखा अधिकारी किंजल कोळी, युवासेना उपविभाग अधिकारी सिद्धेश कवटकर उपशाखाप्रमुख गणेश शिंदे, राजू आंबेरकर, गुरुनाथ कापडोस्कर, प्रथमेश जाधव, कृष्णा गुंडे, मनसेचे विभाग अध्यक्ष संजय भोगले, शाखा अध्यक्ष लवू नर यांच्यासह दोन्ही पक्षांचे इतर कार्यकर्ते जमा झाले होते.




























































