अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, राज्यसभेसाठी शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 5 मार्च हा शेवटचा दिवस असून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उमेदवार असणार हे आज निश्चित झाले. शिवसेना आणि काँग्रेसने शरद पवार यांना राज्यसभेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार सहज विजयी होणार आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावावर चर्चेअंती शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भातील घोषणा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधी भवन येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि आग्रह होता. त्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असणाऱया शिवसेना आणि काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज होती. यासंदर्भात सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मंगळवारीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशीही सुप्रिया सुळे यांनी पह्नवरून संपर्क साधला. काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या नावाला होकार दर्शविला आहे.

सुप्रिया सुळे यांनी मानले आभार

राज्यसभा उमेदवारीसाठी शरद पवार यांना साथ दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मी मनःपूर्वक आभार मानते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र आणि देशाच्या सेवेसाठी आम्ही एकत्र आलोय. महाविकास आघाडी म्हणून अशीच एकजूट ठेवून आम्ही आगामी काळात काम करू व एकमेकांना साथ देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.