राजीनाम्यापर्यंत असा असेल मिंधे गटाच्या भविष्याचा सिक्वेन्स! अनिल परब यांनी दाखवलं स्पष्ट चित्र

Lok Sabha Election 2024 च्या घोषणेनंतर देखील महायुतीत जागांचा तिढा संपताना दिसत नाही. उमेदवारीसाठी मिंधे गट आणि अजित पवार गटाची धडपड सुरू आहे. विशेषत: शिवसेना पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिंधे गटासाठी डोकेदुखी वाढली आहे. मिंधे गटाकडीलच्या जवळपास सर्वच उमेदवारांना भाजपमधून विरोध होत आहे. मतदारसंघांमध्ये गद्दारांच्या विरोधात वातावरण आहे, जनता त्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मिंधे गटातील इच्छुकांना किती जागा नक्की मिळणार आणि मिळालेल्यांपैकी किती जणांना भाजपची साथ मिळणार अशी चिंता इच्छुकांना लागली आहे. जागा टिकवण्यासाठी मिंधे गटाची धावपळ सुरू असण्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी लक्ष्य केलं आहे.

वृत्तवाहिन्यांसोबत बोलताना अनिल परब यांनी मिंधे गटाची अवस्था मांडली. ‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे 13 खासदार गेले या खासदारांना अभय दिलं होतं की तुम्हाला पुन्हा खासदार मी करणारच. त्यासोबत त्यांनी असं देखील म्हटलं होतं की यांच्यापैकी एकही माणूस पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि मी शेती करायला जाईन. आता त्यांनी शेतीची अवजारं जरा धार काढून ठेवावीत’, असा सणसणीत टोला अनिल परब यांनी लगावला.

‘आमचं म्हणणं आहे की कमीत 13 जागा तर राखा पहिल्या नंतर मग उमेदवाराचं भवितव्य, त्यानंतर निवडणूक, त्याच्यानंतर निकाल आणि त्यानंतर राजीनामा हा सिक्वेन्स आहे’, असं म्हणत अनिल परब यांनी मिंधे गटाला त्यांचं भविष्य दाखवलं.