
भ्रष्टाचार, लाचखोरी, वाहतूककोंडी, पाणीटंचाई, बोकाळलेली बेकायदा बांधकामे याविरुद्ध उद्या सोमवारी सर्वसामान्य ठाणेकरांचा जबरदस्त आवाज घुमणार आहे. नागरिकांनो… सामील व्हा आणि आपला संताप व्यक्त करा, असे आवाहन करीत शिवसेना आणि मनसेचा भव्य मोर्चा ठाणे महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे. गडकरी रंगायतन येथून दुपारी चार वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भ्रष्टाचार तसेच अन्यायाविरोधात निघणारा हा मोर्चा ‘न भूतो न भविष्यती’ ठरेल, असा ठाम विश्वास शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
ठाणे महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने या कारभारावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱयांचे फावले असून सर्व खात्यांमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. सरकारकडून कोटय़वधी रुपयांचा निधी मिळाला, पण नेमका तो कुठे खर्च झाला याचा जाब उद्या निघणाऱया शिवसेना, मनसेच्या मोर्चात प्रशासनाला विचारला जाणार आहे. मोर्चामुळे सरकारला आणि पालिकेच्या प्रशासनाला घाम फुटेल असे शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. या मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिक घोडबंदरवासीय, विद्यार्थी, पालक हेदेखील सामील होणार असल्याचे विचारे यांनी स्पष्ट केले.
असा असेल मार्ग
गडकरी रंगायतन येथून सुरुवात-साईकृपा हॉटेल-राम मारुती रोड-सगुना फार्म-घंटाळी मंदिर-साईबाबा मंदिर-तीन पेट्रोल पंप- आराधना टॉकीज-रायगड गल्ली आणि महापालिका मुख्यालय.
राष्ट्रवादीही पूर्ण ताकदीने उतरणार
मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसही पूर्ण ताकदीने उतरणार आहे. सध्या सरकार पालिका चालवीत आहे. अशा स्थितीत अधिकाऱयांची खाबुगिरी वाढली आहे. भ्रष्टाचाराबाबत उद्या नागरिक आयुक्तांना जाब विचारणार आहेत. हा मोर्चा म्हणजे जनतेचा आक्रोश असल्याचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितले.