
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील महापौर आणि याबाबतचे राजकारण यावर महत्त्वाचे भाष्य केले. तसेच फडणवीस यांनी केलेले दावे खोडून काढत फडणवीसांना जबरदस्त प्रत्युत्तर दिले. महायुतीचा महापौर होणार, याची फडणवीसांना खात्री आहे, तर त्यांच्या सहकारी गटाला त्यांचे 29 नगरसेवक का कोंडून ठेवावे लागत आहेत? असा सवालही त्यांनी केला. त्या नगरसेवकांची आधी मुक्तता करा, अशी मागणीही त्यांनी केली.
महायुतीचा महापौर होणार, असे फडणवीस सांगत आहेत. मात्र, महायुतीचा महापौर होणार, याची त्यांना खात्री असती तर त्यांच्या एका सहकारी गटाने त्यांचे 29 नगरसेवक कोंडून ठेवले नसते. हे एवढे सोपे असते, तर आपल्याच राज्यात 29 नगरसेवकांना कोंडून ठेवण्याची वेळ आली नसती, यावर देवाभाऊंचे काय म्हणणे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. त्या नगरसेवकांची आधी सुटका करा, त्यांचे नातेवाईक अपहरणाची तक्रार दाखल करू शकतात, असेही ते म्हणाले. आम्ही आज त्याच हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत, त्यामुळे ते आमच्यावर संशय घ्यायचे, असा जबरदस्त टोलाही त्यांनी हाणाला.
फडणवीस अनेक वर्ष दावोसला जात आहेत. मात्र, राज्यात काही गुंतवणूक येत नाही. त्यांची सर्व गुंतवणूक राजकारणात आणि निवडणुकीत आहे. त्यामुळे परदेशातून राज्यात येणारी गुंतवणूक दिसायला हवी, ती दिसत नाही. दावोसला बसून ते महापालिकांचेच राजकारण बघणार आहेत, तर दावोसला जाण्याची गरजच काय? त्यापेक्षा त्यांनी इथे बसून दावेसमधील गुंतवणूक आणावी. अमित शहा यांचा गट आहे, ज्यांचे 29 नगरसेवक आहेत, त्यांचा हट्ट आहे की, त्यांच्याच गटाचा महापौर व्हावा, हे फडणवीस मान्य करतील का? असा रोखठोक सवालही त्यांनी केला.आपण फडणवीस यांना जे ओळखतो, ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत, ही मागणी ते कधीही मान्य करणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबईतील मराठी मतदारांना भाजपला मतदान केले आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे, असे असेल तर आमचे 76 नगरसेवक निवडून आले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. स्वतःच्याच राज्यात नगरसेकांना डांबून ठेवावे लागत असेल, तर राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, हे मिंध्यांनी फडणवीस यांना दाखवून दिले आहे. अमित शहा यांना त्यांच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस महापौर बनवायचा आहे, मात्र, फडणवीस त्याला मान्यता देणार नाहीत.
काँग्रेसला मुंबईत 25 जागा मिळाल्या, त्यासाठी त्यांचे अभिनंदन आहे. मात्र, ते स्वतंत्र लढण्यामुळे भाजपचा फायदा झाला, असे दिसत आहे. मात्र, पुढील वाटचातील, ते आमच्यासोबतच राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच ठाकरे बंधूंची युती ही आकडेवारी आणि जागांसाठी झाली नव्हती. मराठी माणसाच्या एकीसाठी ही युती आहे, हे फडणवीसांना लक्षात घ्यावे, असेही संजय राऊत यांनी खडसावले.



























































