
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील महापौर आणि याबाबतचे राजकारण यावर महत्त्वाचे भाष्य केले.मुंबईचा महापौर ठाकरे बंधूचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये, ही सगळ्यांची भावना आहे, असे परखड मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच आपल्याच राज्यात आपलेच नगरसेवक फुटण्याची भीती वाटणे, ही राज्याच्या राजकारणातील हास्यजत्रा आहे, असा जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला.
अमित शहा यांची कंपनी मिंधेचा गट हे भाजपचे अंगवस्त्र आहे. अमित शहा हे त्या गटाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्या मुंबईत आमच्याच गटाचा महापौर व्हावा, हे त्यांच्या गटाचे म्हणणे ते शहा यांच्याकडे मांडू शकतात. मात्र, सध्या फडणवीस त्यांचे काही ऐकण्याच्या स्थितीत नाही. ते मुंबईत शहा यांच्या गटाच्या माणसाला महापौरपद देणार आहेत का? या सर्व परिस्थितीत काही भीती असल्याने मिंधे यांनी त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील ताज लँडएन्डमध्ये कोंडून ठेवले आहे. ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना स्वतःचे नगरसेवक फुटण्याची भीती वाटते, हे आश्चर्य आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेचे आमदार फोडून ते सूरत, गुवाहाटीसारख्या सुरक्षित ठिकाणी गेले होते. त्यांनी नगरसेवकांनाही सूरत किंवा अहमदाबादला न्यायला हवे होते. त्यांच्यासाठी सूरत हीच सुरक्षित जागा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद असतानाही त्यांना फडणवीस यांच्या राजवटीत असुरक्षित वाटत आहे. आपल्याच राज्यात आपलेच नगरसेवक फुटण्याची भीती त्यांना वाटत असेल तर ही राज्याच्या राजकारणातील हास्यजत्रा आहे, असेही ते म्हणाले.
ते नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? हा आपला प्रश्न आहे. त्यांचे जे नगरसवेक निवडून आले आहेत, ते मूळचे शिवसेनेचेच आहेत. त्यांचे संदेशही आम्हाला येत आहेत. त्यांच्या मनातही मराठी अस्मितेची मशाल धगधगत आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे त्यांनी सर्वांनी ठरवले आहे. जे निवडून आलेले नगरसेवक आहेत, ते मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसैनिकाच्या मनात मुंबईची एक वेगळे स्थान आहे. त्यांनी नगरसेवकांना कोंडून ठेवले तरी संदेशवहन, दळणवळणाची अनेक साधने असतात. त्यामुळे संपर्क होतच असतो, असे ते म्हणाले.
मुंबईचा महापौर ठाकरे बंधूचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये, ही सगळ्यांची भावना आहे. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर होऊ शकतो, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची चर्चा झाली आहे. अनेकांशी आमच्या चर्चा सुरू आहे. सध्या सर्व घडामोडींकडे आम्ही तटस्थतेने बघत आहोत. मात्र, पडद्यामागे अनेक हालचालही होत असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौरपदावर शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दावा आहे, असे म्हणण्यापेक्षा जे आकडेवारी आहे, ती समसमान आहे. फक्त चारच फरक आहे. जगातला सर्वात मोठा पक्ष, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि सत्ता आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष शिवसेना फोडून अमाप पैसा वापरून त्यांना फक्त चारचेच बहुमत मिळाले आहे. बहुमत हे मोठे असू द्या किंवा छोटे असू द्या, बहुमत हे चंचल असते, हे ऐतिहासिक सत्य आहे. सध्याचा हा एकखांबी डोलारा मोदींच्या करंगळीवर उभा आहे, असे त्यांनी परखडपणे सांगितले.



























































