छत्रपतींच्या गादीचा अवमान; मंडलिकांविरोधात संताप कायम; ‘बेंटेक्स खासदार’च्या घोषणा देत शिवसेनेकडून निदर्शने

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे दत्तक आल्याचे वादग्रस्त विधान करून छत्रपतींच्या गादीचा जाणीवपूर्वक अपमान करणारे मिंधे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्याविरोधात संतापाची लाट कायम आहे. आज दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ऐतिहासिक मिरजकर तिकटी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. मंडलिक यांचा ‘बेंटेक्स खासदार’ असा उल्लेख करत धिक्काराच्या घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विशाल देवकुळे, हर्षल सुर्वे, मंजित माने, राहुल माळी, सुशील भांदिगिरे, युवराज खंडागळे, रवि चौगुले, प्रसाद कुलकर्णी, दत्ता टिपूगडे, लतीफ शेख, गोविंद वाघमारे, प्रशांत सूर्यवंशी, दिलीप देसाई, विवेक काटकर, दत्ता पाटील, दीपाली शिंदे, राजू सांगावकर आदी शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक प्रचार करताना विकासकामांचे मुद्दे अपेक्षित – संजय पवार

– निवडणुकीचा प्रचार करताना आजपर्यंत केलेली विकासकामे आणि निवडून आल्यानंतर करावयाच्या विकासकामांचे मुद्दे घेऊन जनतेत प्रचार करणे अपेक्षित आहे. पण संजय मंडलिक यांनी शिवसेनेशी केलेली गद्दारी आणि त्यांची बेंटेक्स (नकली सोने) अशी प्रतिमा आजही जनतेत कायम असल्याने या द्वेषातूनच त्यांनी जाणीवपूर्वक नाहक दत्तक प्रकरण काढून छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. शाहूप्रेमी जनता हा प्रकार खपवून घेणार नाही. सुज्ञ जनताच मंडलिकांना धडा शिकवण्यास सरसावल्याचा इशारा शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी दिला.