हिंगोलीत शिवसैनिकांनी कृषिमंत्री भरणे यांचा ताफा रोखला!

अतिवृष्टीने हिंगोली जिल्हय़ातील 80 टक्के शिवारातील खरिपाचा चिखल झाला आहे. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱयांकडे पाठ फिरवली. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी ‘दिव्यदृष्टी’ने पुलावरूनच नुकसानीची पाहणी केली. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी तर तेवढेही सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे वाशिमहून नांदेडकडे निघालेला कृषिमंत्र्यांचा ताफा संतप्त शिवसैनिकांनी रोखला आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाही दिल्या.

हिंगोली जिल्हय़ात पावसाने अक्षरशः तांडव घातले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्हय़ातील जवळपास चार लाख हेक्टरवरील खरीप नेस्तनाबूत झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

वाशिमहून हिंगोलीमार्गे नांदेडकडे निघालेल्या कृषिमंत्री दत्ता भरणे यांना वाटेतच अतिवृष्टीची पाहणी करणे सहजशक्य होते. परंतु भरणे यांचा ताफा तसाच भरधाव निघाला. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी कनेरगाव नाका येथे महामार्गावर भरणे यांचा ताफा अडवला. शिवसैनिक काळे झेंडे घेऊन रस्त्यावर ठाण मांडून बसलेले पाहताच ताफ्यातील पोलिसांची तारांबळ उडाली. शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख यांच्यासह गणेश गावंडे, संदीप तनपुरे आदी शिवसैनिकांनी दत्ता भरणे यांच्या गाडीसमोर जाऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत जोरदार आंदोलन केले.