
शिवडी ते नाव्हाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडचे काम पूर्ण होऊन दोन महिने झाले आहेत. मात्र अद्याप हा मार्ग जनतेसाठी खुला करण्यात आलेला नाही. या मार्गाचे अवघे 15 टक्के काम पूर्ण करण्यास मिंधे सरकारने दीड वर्षांचा कालावधी घेतला. त्यावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिंधे सरकारला फटकारले आहे.
‘कामापेक्षा शायनिंग जास्त, व्हीआयपीमुळे जनता त्रस्त’, अशा शब्दात शिवसेनेने ट्विटरवरून मिंधे सरकारच्या दिरंगाईवर टीका केली आहे. शिवसेनेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडचे काम महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कशाप्रकारे जलदगतीने झाले व मिंधे सरकारने कसा वेळकाढूपणा केला याचा घटनाक्रम दाखवला आहे.
‘मविआ सरकारच्या काळात 15 जानेवारी 2022 रोजी या प्रकल्पाचा गर्डर लाँच झाला. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या पुलाच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी बैठका घेत योग्य नियोजन केले होते. कोविड काळातही या पूलाचे काम सुरू होते. जून 2022 मध्ये गद्दारांनी भाजपसोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार पाडेपर्यंत या पूलाचे तब्बल 85 टक्के काम पूर्ण झाले होते. त्यानंतर उरलेल्या 15 टक्के कामासाठी घटनाबाह्य सरकारने दीड वर्षांचा वेळ घेतला. आता काम पूर्ण होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ होऊन गेलाय, पण व्हीआयपी मिळत नसल्याने या पूलाचे उद्घाटन रखडले आहे. त्याला मुहूर्त कधी मिळणार”, असा सवाल शिवसेनेने या पोस्टमधून केला आहे.


























































