धारावी विकासकाचे खिसे भरण्यासाठी देणार नाही! शिवसेनेची 16 डिसेंबरला ‘अदानी’वर धडक

धारावी म्हणजे फक्त आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी नाही तर मुंबईतले उद्योग आणि रोजगाराचे महत्त्वाचे पेंद्र आहे. तब्बल पाच हजार उद्योग, 15 हजार छोटय़ा-मोठय़ा फॅक्टरीज, अडीच लाख लोकांना मिळणारा रोजगार आणि देश-विदेशातील अनेक उद्योगांना कच्च्या मालासह तयार वस्तू पुरवणारी मुंबईचे आर्थिक केंद्र असणारी ‘सोन्या’सारखी धारावी विकासकाच्या खिशात घालू देणार नाही, असा ठाम निर्धार शिवसेनेने केला आहे. धारावी विकासकाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी आणि धारावीकरांच्या हक्कासाठी 16 डिसेंबर रोजी ‘अदानी’वर धडक देण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. यासाठी शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या टिझरला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्पेशल प्रोजेक्ट जाहीर करूनही धारावीकरांना फक्त 300 फुटांची जागा देण्याचा घाट सरकारने घातला असून विकासक अदानीवर मात्र सवलतींचा वर्षाव केला आहे. कोणत्याही हरकती-सूचना न मागवता सरकारने थेट विकासाची हमी घेतली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणचा ‘टीडीआर’ मुंबईत कुठेही वापरण्याची मुभा अदानीला दिल्यामुळे इतर विकासकांना पहिल्यांदा टीडीआर वापरायचा असेल तर तो अदानीकडून घ्यावा लागणार आहे. हा प्रकार म्हणजे ‘सब मुंबई अदानी की’ असा आहे. यातच सर्व्हे रखडला असून पुनर्विकासाबाबत धारावीकरांना कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे कॉट्रक्टटरांचे सरकार आणि अदानीला जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबर रोजी धारावीतून अदानीच्या कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता हा मोर्चा निघणार आहे.

धारावी… मुंबईला आर्थिक पाठबळ देणारे इंधन!

– हजारो उद्योग आणि रोजगार निर्माण करणारे केंद्र असणाऱया धारावीत पुंभारकाम, कापड उद्योग मोठय़ा प्रमाणावर चालतो. शिवाय कचऱयावर प्रक्रिया करून पुनर्वापर करता येणारा उद्योग इथल्या सुमारे अडीच लाख लोकांना रोजगार पुरवतो. त्यामुळे धारावी मुंबईला आर्थिक पाठबळ देणारे इंधनच असल्याचे टिझरमध्ये म्हटले आहे.
परदेशातील बाजारपेठाही धारावीवर अवलंबून

– चामडय़ाच्या वस्तू, दागिने, विविध उपकरणे, कापड इत्यादी गोष्टी धारावीतून जगभरात निर्यात केल्या जातात. अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये अनेक बाजारपेठा प्रामुख्याने धारावीतील उत्पादनावर चालतात. दरवर्षी जवळपास 5400 ते 8300 कोटींची उलाढाल धारावीतून होते. त्यामुळे परदेशातील अनेक बाजारपेठाही धारावीवर अवलंबून आहेत.

‘मुंबईकर’ म्हणून सहभागी व्हा!

धारावी पुनर्विकास प्रकल्पासह अभ्युदय नगर, आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशन क्लस्टर प्रोजेक्ट असे मुंबईतील आणखी तीन बडे प्रकल्प सरकार अदानीच्या घशात घालण्याचा डाव आखत आहे. मात्र शिवसेना सरकारचा डाव हाणून पाडेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधीच बजावले आहे. तर ‘सामान्य माणसांनी उभे केलेले उद्योग आणि रोजगाराचे प्रमुख पेंद्र एक विकासक टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार का’ असा सवाल करतानाच ‘मुंबईकर’ म्हणून या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन टिझरमधून करण्यात आले आहे.