पालकमंत्री विमानात, नागरिक खड्ड्यात! रत्नागिरीकरांसाठी शिवसेना उतरली रस्त्यावर

रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. अनेक जण पाठदुखी आणि मानदुखीचे शिकार बनले आहेत. रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक संतापले आहेत. नागरिकांचा आवाज बुलंद करत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मारूती मंदिर येथे रस्ता रोको करून तातडीने रस्ते दुरूस्त करण्याची मागणी केली.

आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि शिवसैनिकांच्यात शाब्दिक चकमक उडाली. आम्ही लोकशाहीत आहोत दडपशाही आम्हाला दाखवू नका. आम्ही अशी आंदोलने करून यापूर्वीच तुरुंगात जाऊन आलो आहोत. तुम्ही दडपशाही करता खड्ड्यातून जाताना तुमची कंबर मोडत नाही का? असा सवाल उपनेते बाळ माने यांनी शहर पोलीस निरीक्षकांना विचारताच वातावरण तापले.

रत्नागिरीतील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. काही रस्त्यांवर तळी तयार झाली आहेत.तर काही रस्त्यांची चाळण झाली आहे तिथे रस्ता शोधावा लागतो. मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे कामही अर्धवट असल्याने तिथेही वाहनचालकांना चढ-उताराचा सामना करावा लागत आहे.

गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका रस्त्यावरील खड्ड्यातून गेल्या त्यावेळी भाविकांना त्रास सहन करावा लागला. हीच परिस्थिती नवरात्रोत्सवात कायम राहिल्याने नागरिक संतापले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शनिवारी दुपारी बारा वाजता मारूती मंदिर येथे पालकमंत्री उदय सामंत आणि नगर परिषदेच्या ठेकेदारांविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

‘अच्छे दिन नको रस्ते अच्छे हवेत’,’खराब रस्ते म्हणजे जीव धोक्यात सरकारला याची जाणीव आहे का?’, ‘रस्ते नाही फक्त खड्डे आणि वेदना’ असे फलक आणि भगवे झेंडे घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरले त्यावेळी वातावरण तापले होते.आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने, तालुकप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, माजी नगरसेवक सलील डाफळे, रशीदा गोदड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दिवाळीपूर्वी रस्ते दुरूस्त करा – बाळ माने

यावेळी उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि नगरपरिषदेचा खरपूस समाचार घेतला. पालकमंत्री परदेश दौरे करत आहेत, विमानातून फिरत आहेत. त्यांना निवडून देणारी जनता मात्र खड्ड्यातून जात आहे हे दुर्दैव आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहून त्यात डांबर होतं की नाही अशी शंका उपस्थित करताना सिमेंटचे रस्तेही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप बाळ माने यांनी केला. दिवाळीपूर्वी शहरातील रस्त्यांची दुरून करा. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका नाही तर शिवसेना यापेक्षा तीव्र आंदोलन करेल असा इशारा बाळ माने यांनी दिला.