
मुंबईतील मराठी माणसाच्या सुखकर आयुष्यासाठी, मुंबईच्या विकासासाठी अखंडपणे आणि अथकपणे कार्य करत राहू, असा ठाम निर्धार शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी वरळी येथील सेंट रेगीस हॉटेलमध्ये आज मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह माजी महापौर, अर्थतज्ञ, कायदेतज्ञ यांनी या शिबिरात अमूल्य मार्गदर्शन केले.
आजी-माजी नगरसेवकांचा वैचारिक मेळ व्हावा, जुन्यांना नव्यांची ओळख व्हावी आणि नव्यांना महानगरपालिकेचे कार्य, प्रशासन आणि कायद्यांची ओळख व्हावी हा शिबिरामागचा उद्देश होता. या शिबिरात शिवसेना नेते-आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी सर्व नगरसेवकांना महापालिकेचे कायदे आणि प्रक्रियांबाबत विस्तृतपणे माहिती दिली. उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे आदींनीही या वेळी मार्गदर्शन केले, अशी माहिती पालिकेतील विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांनी दिली. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, उपनेत्या नगरसेवक विशाखा राऊत, शिवसेना-युवासेना सचिव, आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे, रमाकांत रहाटे, हेमांगी वरळीकर, सुहास वाडकर, निशिकांत शिंदे या वेळी उपस्थित होते.




























































