दुष्टशक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, शिवसेनेची पेटली मशाल, शिवसेना गीत महाराष्ट्राच्या घराघरात दुमदुमणार

‘लोकसभेचा रणसंग्राम जिंकणारच’ या निर्धाराने शिवसेनेची घोडदौड सुरू आहे. शिवसेनेचे चिन्ह असलेली मशाल आता हुकूमशाही भस्मसात करण्यासाठी धगधगली आहे. महाराष्ट्राच्या मनामनात अंगार फुलवणारं दणदणीत, खणखणीत आणि तेजस्वी असं शिवसेना गीत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तमाम जनतेसमोर सादर करण्यात आलं. दुष्टशक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या पेटू दे शिवसेनेची मशाल… अशी साद या गीतातून घालण्यात आली असून राज्याच्या कानाकोपऱयात आणि घराघरात हे गीत आता दुमदुमणार आहे. शिवसैनिकांमध्ये ऊर्जा जागवण्याचे काम हे गीत करणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्व शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे शिवसेनेचे नवे गीत प्रसिद्ध करण्यात आले. शिवसेनेला मशाल ही नवी निशाणी मिळाल्यानंतरचे हे शिवसेना गीत दमदार पहाडी आवाजात सादर केले गेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मशाल प्रत्येकाच्या मनामनात पोहोचावी यासाठी हे गीत स्फूर्तिदायक ठरणार आहे.

हुकूमशाही, जुमलेबाजी राजवट मशालीने भस्म होईल

मशाल या निशाणीने शिवसेनेची विजयी सुरुवात अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून झालेलीच आहे. आता तर मोठी सार्वत्रिक निवडणूक आम्ही लढत आहोत. मशाल हे केवळ चिन्ह नाही, तर सरकारविरुद्धचा असंतोष या मशालीच्या रूपाने भडकणार आहे आणि त्यात ही हुकूमशाही व जुमलेबाजी राजवट जळून भस्म होईल, असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

एक स्वप्न आणि एक चिन्ह

शंखनाद होऊ दे, रणदुदुंभी वाजू दे, नादघोष गर्जू दे विशाल… दुष्टशक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, शिवसेनेची पेटली मशाल, असे गीताचे बोल आहेत. हुकूमशाही शक्तीचे पारिपत्य करून मशालीचा प्रकाश देशाला नवी दिशा दाखवेल असा विश्वास या गीताच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला. एक स्वप्न आणि एक चिन्ह म्हणून शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचवा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

व्हिडीओ आणि ऑडियो स्वरूपात शिवसेनेचे हे मशालगीत आहे. व्हिडीओमधून प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे अशा ठाकरे कुटुंबाच्या चार पिढय़ा आणि शिवसेनेचा धगधगता संघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे. राहुल रानडे यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत शिवसेनेच्या उमेदवारांचा आवाज बनणार आहे.

शंखनाद होऊ दे,
रणदुदुंभी वाजू दे
नादघोष गर्जू दे … विशाल!
शिवसेना…
दुष्टशक्ती जाळण्या,
मार्ग स्पष्ट दावण्या
पेटू दे शिवसेनेची मशाल…
हिंदू हा तुझा धर्म,
जाणून घे हेच मर्म
जीवन कर त्यास तू बहाल…
दुष्टशक्ती जाळण्या,
मार्ग स्पष्ट दावण्या
शिवसेनेची पेटली मशाल…
एक स्वप्न, एक चिन्ह
शिवसेनेची मशाल!
जय भवानी…