
रिलायन्स समूहाचा नागोठणे येथे सुमारे ७० हजार कोटींचा प्रकल्प उभा राहत आहे. नागोठणे शहराचा विकास गुजरातमधील जामनगरच्या धर्तीवर करणार असल्याचे आश्वासन रिलायन्स समूहाने दिले होते. मात्र या आश्वासनाला समूहाने हरताळ फासला आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांनी दिला आहे.
रिलायन्स समूहाच्या नागोठणे प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा स्थानिक नागरिकांना रोजगार, मुलांना आधुनिक शिक्षण, ठेकेदाराची कामे, जामनगरच्या धर्तीवर शहराचा विकास अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र त्यापैकी एकही आश्वासन रिलायन्स समूहाने पाळले नाही, असे किशोर जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच अकलाक पानसरे, प्रकाश जैन, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, मोहन नागोठणेकर, संतोष नागोठणेकर, सचिन ठोंबरे, दीपक गायकवाड, शैलेश रावकर, अनिल महाडिक आदी उपस्थित होते.
प्रकल्पाला विरोध नाही
रिलायन्स समूहाच्या नागोठणे येथील प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा कोणताही विरोध नाही. रिलायन्स नागोठणे असा या प्रकल्पाचा गाजावाजा कंपनीने जगभर केला आहे. प्रत्यक्षात नागोठणे शहराला या प्रकल्पाचा काहीएक उपयोग होत नाही. प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने कामगार शहरात वास्तव्यासाठी आले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रक्रिया, रस्ते वाहतूक या सेवांवर कमालीचा ताण पडला आहे, असेही किशोर जैन यांनी यावेळी स्पष्ट केले.
































































