वाईः शिवतीर्थक्षेत्र – शिवमंदिरांच्या राज्यात

407

>> नीती मेहेंदळे

वाईची मंदिरं आठवली की, पहिला आठवतो तो महागणपती. त्याचे मंदिर ही वाईची ओळख आहे. तसंच महालक्ष्मी व विष्णू मंदिरही जुन्या घडणीचं आहे, पण तिथे एकाहून एक सुंदर शिवमंदिरं आहेत आणि नदीपात्र ओलांडायचं ठिकाण म्हणजे तीर्थ, ज्यामुळे मला वाई हे शिवतीर्थक्षेत्र म्हणायचा मोह होतो. 

महाबळेश्वरी उत्पत्ती झालेली कृष्णा इथे संथ होतेच जराशी. तिला कोणी काहीही संबोधावं. स्कंदपुराणासारखं वैराजक्षेत्र म्हणा, तर्कतीर्थांसारखं वायदेश नाहीतर आपलं महाभारतीय विराटनगरी म्हणा, ती आपले काठाघाटांचे रेखीव बांधीव पदर खुश्शाल पाण्यात  सोडून आपल्या एकसे एक सुबक धाटणीच्या मंदिरांची चुनेगच्चीतील कोनाडेयुक्त शिखरं आणि कळस न्याहाळत  बसून आहे. शतकानुशतकं…

शिवरायांच्या कारकीर्दीत अफझलखानाचा तळ वाईत होता हे आपण शालेय जीवनात वाचलं होतं. पुढे ही नगरी पेशवेकाळात अधिक जाणिवेने वसवली गेली. इथल्या मंदिरांची उभारणी आणि जीर्णोद्धार हे बहुतकरून सरदार रास्ते व इतर काही पेशव्यांच्या सरदारांनी केल्याचे पेशवेकालीन दस्तऐवज तसेच काही इथल्या मंदिरांमधले लेख सांगतात.

सर्वप्रथम गणपती घाटापाशी ढोल्या गणपती किंवा महागणपतीची भव्य मूर्ती पाहून जवळच पहिलं शिवमंदिर लागतं ते काशीविश्वेश्वराचं. वाईमधलं हे एक तटबंदीयुक्त व त्यामुळे सुरक्षित राहिलेलं देखणं मंदिर. मंदिरासमोरचा भव्य नंदीमंडप हे खास पेशवेकालीन मंदिरांचं व्यवच्छेदक लक्षण. याची द्वारशाखा समृद्ध दिसते आणि विशेष म्हणजे तिच्यात माकडं एकावर एक उभी असलेली अशीही एक शाखा दिसते. थोडं उत्तरेला गंगापुरी घाटाजवळचं उमामहेश्वर हे पंचायतन मंदिर. आत दगडी भिंतींवर चित्रं दिसतात, जी आज संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत.

ब्राह्मणशाही हा वाईतला मोठा भाग मंदिरांनी गजबजलेला आहे. या भागातून घाटाच्या दिशेने पुढे आलो तर नदीपात्रात काही मंदिरं दिसतात. ब्राह्मणशाहीमधल्या कालेश्वराचं शिल्पकाम उल्लेखनीय असं आहे. विश्वेश्वराप्रमाणे इथेही पर्णफुलांनी सजवलेली द्वारशाखा दिसते. मराठा संस्कृतीत शृंगारशिल्पं तशी कमीच पाहायला मिळतात. इथल्या मूर्तींमधली सौंदर्यस्थळे ही उन्नत नाहीत व ती अभावाने असल्याने ही शृंगारशिल्पे मराठा कलाकारांनी केवळ कामशिल्प परंपरा चालू ठेवण्यासाठी घडवली असावीत असे वाटते. धर्मापुरी घाटाजवळचं अजून एक तटबंदीयुक्त मंदिर म्हणजे हरिहरेश्वराचं. हे पेशवेकाळात रास्ते सरदारांनी बांधल्याचं तिथे असलेल्या लेखात समजतं. या प्रशस्त मंदिराला एक लहानसा दगडी सभामंडप व पुढे लाकडी सभामंडप लाभला आहे. गाभाऱयाबाहेर भव्य नंदीची, अष्टभुजा देवीची मूर्ती आणि मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर सिंह, व्याल व शरभाची शिल्पं उठावात कोरलेली दिसतात. धर्मापुरी घाटाजवळ कोटेश्वराचं भावे यांचं शिवमंदिर आहे, ज्यात भित्तिचित्रं आढळतात.

या सर्वांव्यतिरिक्त रास्ते सरदार परिवारात प्रमुख पुरुषाच्या स्मरणार्थ शिवमंदिर बांधण्याची प्रथा असावी असे दिसते. अशीही काही लहानसहान मंदिरं घाटाच्या काठी किंवा पात्रात दिसतात. त्यावरून कंबोडियामधली राजाच्या आईवडिलांची स्मारक मंदिरं आठवतात.

गावापासून थोडं पूर्व दिशेने जवळच भद्रेश्वरचं पेशवेपूर्व काळातलं देऊळ लागतं. याचा सभामंडप दगडी बंदिस्त असून त्यात अंधार आहे. स्कंदपुराणाच्या साठाव्या अध्यायात कृष्णामाहात्म्य आहे व त्यात या स्थानास कलियुगात भद्रेश असे संबोधले आहे. या परिसरातही जास्त सुरेख स्वतंत्र घाट बांधून काढलेला दिसतो व विशेष म्हणजे नगरच्या निघोजसारखे इथे नदीपात्रात पॉटहोल्स किंवा रांजणखळगे दिसतात.  या व वाईच्या मंदिरांचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे शिखरातले कोनाडे व त्यातील मूर्ती. फार शतकांपूर्वी वाई भागात शंभराच्या आसपास मंदिरं होती म्हणे.

वाईला कृष्णेसारख्या पुराणात स्थान असलेल्या प्राचीन नदीचा काठ लाभलाय. आज मानवाच्या आणि नदीच्या अतिपरिचयाने अवज्ञेचे पडसाद तिच्या काठावर उमटलेले दिसून येतात. तिच्या काठचे घाटही त्यातून सुटलेले नाहीत हे खरं असलं तरी कोणा सरकार बाहुल्यांकडे निर्देश करत न बसता प्रत्येक नागरिकाने आपल्यापरीने या वारशाचं संवर्धन करणं क्रमप्राप्त आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या