
>> शिवानी घोंगडे
बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढय़ात अमूल्य योगदान दिले. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांनी यासंदर्भातील अज्ञात इतिहास त्यांच्या गेल्या 13 वर्षांतील अथक प्रयत्नांतून शोधला आहे. त्यांच्या या संशोधनातून ‘सार्वभौम महाराजा सयाजीराव’ हा मूळ दस्तऐवजांचा परिचय करून देणारा ग्रंथ औरंगाबादच्या महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रकाशित होत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढय़ाच्या इतिहास लेखनातील हा एक क्रांतिकारक टप्पा आहे. यानिमित्ताने या अज्ञात इतिहासाला उजाळा देण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
महाराजा सयाजीराव गायकवाड हे 1875 ला बडोद्याच्या गादीचे वारस म्हणून दत्तक गेले आणि 1881 ला त्यांच्या हाती राज्यकारभाराची सूत्रे सोपविण्यात आली. या 58 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत सयाजीरावांनी विविध क्षेत्रांतील शेकडो देशविदेशांतील विद्वानांशी संवाद ठेवला. त्यांनी आपल्या प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर अनेक ज्ञानी लोकांची नेमणूक केली. सयाजीरावांच्या प्रशासनातील अशा अनेक कर्तबगार व्यक्तींपैकी एक यशस्वी आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेला अधिकारी म्हणून खासेराव जाधव यांचा विचार करावा लागतो.
खासेराव जाधव सयाजीरावांचे नातेवाईक होते. सयाजीरावांच्या मातोश्री महाराणी जमनाबाई यांचे वडील विश्वासराव माने हे खासेरावांचे मामा होते. खासेरावांचा जन्म रहिमतपूर या मामांच्या गावी 24 ऑगस्ट 1864 ला झाला, तर त्यांचे मूळ गाव पुण्याजवळील परिंचे हे होते. शिक्षणासाठी त्यांना पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ठेवले होते. मॅट्रिक परीक्षेनंतर खासेरावांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून इंटरमीजिएटची परीक्षा उत्तीर्ण केली. खासेरावांचे वडील भगवंतराव जाधव जमनाबाईंचे मानकरी असल्याने खासेराव उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत बडोद्याला येऊ लागले. या काळात त्यांचा मुक्काम राजवाडय़ातच असे.
खासेराव जाधव आणि सयाजीराव यांच्यातील नाते फारच जिव्हाळ्याचे होते. ते सयाजीरावांचे जिवलग मित्र आणि विश्वासू अधिकारी होते. सयाजीरावांनी त्यांचे लहान बंधू संपतराव गायकवाड आणि खासेराव यांना 1884 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. तेथे खासेरावांनी ऑक्सफर्डच्या कृषी महाविद्यालयात कृषीविषयक पदवी घेतली. 1890 मध्ये ते शिक्षण पूर्ण करून लंडनहून बडोद्याला आले. लंडनहून परत येताना त्यांनी तंत्रज्ञान, शेती, दुग्ध व्यवसाय, फळबाग, पाणी व्यवस्थापन या विषयांची महत्त्वाची पुस्तके बडोद्यासाठी आणली. त्याबरोबर पारतंत्र्याच्या बेडय़ा तोडून स्वतंत्र भारताचे स्वप्न घेऊन ते परतले. सयाजीरावांनी 1897 ला खासेरावांच्या नेतृत्वाखाली बडोद्यात कृषी खात्याची स्थापना केली. बडोद्यात शेतकऱयांच्या कल्याणाच्या ज्या सर्व योजना राबविल्या गेल्या त्याचे सूत्रधार खासेरावच होते.
खासेराव जाधवांनी सयाजीराव आणि शाहू महाराज यांच्यातील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. शाहू महाराज खासेरावांना गुरुस्थानी मानत. सयाजीरावांचे नातू आणि बडोद्याचे उत्तराधिकारी प्रतापसिंह यांच्या शिक्षणाचा आराखडा खासेरावांनी तयार केला होता. प्रतापसिंहांचे पालक झाल्यानंतर राजपुत्रांच्या शिक्षणासाठीची त्यांनी जी टाचणे काढली ती ‘वेकअप प्रिन्सेस’ या नावाने ग्रंथबद्ध झाली. प्रतापसिंहांवर कुटुंबकलहातून विषप्रयोग होऊ शकतो ही शक्यता विचारात घेऊन खासेराव प्रतापसिंहांना जे अन्न-पाणी दिले जाई ते प्रथम स्वत: ग्रहण करू लागले. यातच एके दिवशी विषबाधा होऊन खासेरावांचा मृत्यू झाला. यातून राजासाठी आणि राज्यासाठी स्वत:च्या प्राणाचे बलिदान देण्याची तयारी असणाऱया अशा लोकांमुळेच एखादे राज्य परिपूर्ण व महान कसे बनते याचा दाखला मिळतो.
लंडनमध्ये शिकत असतानाच खासेरावांचा भारताच्या स्वातंत्र्य लढय़ाशी संबंध आला. 1884 ते 1890 या कालावधीत लंडनमध्ये असताना श्यामजी कृष्ण वर्मा व त्यांचा क्रांतिकारकांचा गट यांच्याशी खासेरावांची मैत्री झाली. केशवराव देशपांडे, गोविंदराव माडगावकर आणि अरविंद घोष यांच्याशी त्यावेळी झालेली मैत्री आयुष्यभर टिकली. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने प्रयत्न करणाऱया सर्व क्रांतिकारकांना सयाजीराव खासेरावांमार्फत सहकार्य करत असत.
खासेराव जाधव, त्यांचे लहान बंधू मेजर माधवराव, प्रो. माणिकराव यांनी अरविंद घोष बडोद्यात येण्यापूर्वी समविचारी मित्रांचा गट असणारी ‘तरुण संघ’ नावाची संघटना स्थापन केली होती. पुढे अरविंद घोष व केशवराव देशपांडे बडोद्यात आल्यानंतर या संघटनेच्या कामास अधिक वेग आला. अरविंद घोष खासेरावांच्या घरीच राहू लागले. खासेराव जाधवांचे निवासस्थान हे क्रांतिकारकांचा अड्डा बनला. या ठिकाणी लोकमान्य टिळक, सयाजीराव, अरविंद घोष यांच्या भेटीगाठीतून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा आराखडा तयार होत गेला. खासेरावांवर लोकमान्य टिळकांच्या विचारांचाही प्रभाव होता. खासेरावांच्या पुढाकाराने बडोद्यात गणेशोत्सव, शिवजयंती हे राष्ट्रप्रेमाच्या निमित्त होणारे कार्पाम सुरू झाले.
अरविंद घोष यांच्या कल्पनेतून आणि सयाजीरावांच्या पाठिंब्याने नर्मदेकाठी ‘भारतीय गंगनाथ राष्ट्रीय विद्यालया’ची स्थापना करण्यात आली. अरविंद घोष, खासेराव जाधव, केशवराव देशपांडे आणि प्रा. माणिकराव हे या राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक होते. राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झालेले देशभक्त तयार करण्याच्या उद्देशाने 17 मे 1905 या दिवशी राष्ट्रीय विद्यालयाची सुरुवात झाली. थोडय़ाच काळात बडोद्यातील हे विद्यालय राष्ट्रीय घडामोडींचे प्रमुख केंद्र बनले, परंतु ब्रिटिश सरकारला हे विद्यालय राजद्रोह वाटू लागला. ब्रिटिश सरकारच्या वाढत्या दबावामुळे डिसेंबर 1911 ला हे विद्यालय बंद करण्यात आले.
ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्यासाठी बंडखोर देशभक्तांची आणि सैनिकांची संख्या वाढली पाहिजे असे खासेरावांचे ठाम मत होते.. यासाठीच खासेराव आणि अरविंद घोषांनी महाराजांच्या सहकार्याने बडोद्यात एक महत्त्वाची क्रांतिकारी घटना घडवून आणली. खासेरावांचे लहान बंधू माधवराव जाधव हे बडोदा सैन्यात मेजर होते. माधवरावांना स्विस सैनिकी प्रशिक्षणासाठी स्वित्झर्लंडला पाठविण्याची योजना बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष आणि खासेराव जाधवांनी तयार केली.
नवीन शस्त्रांचा अभ्यास करणे, बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू होता. या प्रशिक्षणासाठी सयाजीरावांनी माधवरावांना रजा मंजूर करून प्रशिक्षणाच्या खर्चाची तरतूदही केली. त्याचबरोबर बाळ गंगाधर टिळकांनी लंडनमधील क्रांतिकारी श्यामजी कृष्ण वर्मा यांना पत्र लिहून माधवरावांना प्रशिक्षण काळात पैसे कमी पडल्यास मदत करण्यास सांगितले. माधवरावांनी प्रशिक्षण पूर्ण करून येताना बरोबर सैनिकी व्यवस्थापनाची सुमारे दोनशे पुस्तके आणली. प्रशिक्षण घेऊन परत आल्यानंतर माधवरावांनी बडोद्यात विश्वासू अधिकाऱयांच्या मदतीने क्रांतिकारकांना प्रशिक्षण देण्याचे केंद्र सुरू करण्याची योजना अरविंद घोष आणि खासेरावांनी आखली.
1909 ला खासेराव जाथव मेहसाणा जिह्याचे जिल्हाधिकारी होते. खासेरावांच्या प्रेरणेने नरसिंहभाई पटेल यांनी गावातील शिक्षक प्रेसमध्ये ‘मुक्ती कोन पथे’ या बंगाली क्रांतिकारी पुस्तकाचा गुजराती अनुवाद छापला. यापूर्वी नरसिंहभाईंनी क्रांतिकारी गॅरिबाल्डीचे चरित्रही छापले होते. दुसऱया एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ‘वनस्पती’ असे शीर्षक आणि आत मात्र बॉम्ब कसे तयार करावे याची माहिती दिली होती. राष्ट्रवादाची प्रेरणा देणारी ही सर्व पुस्तके इंग्रज पोलीस अधिकाऱयांनी जप्त केली. खासेरावांनी त्या इंग्रज पोलीस अधिकाऱयांना बडोदा सरकारच्या हद्दीत छापा टाकायला तुम्हाला कोणी परवानगी दिली? अशा कडक शब्दांत खडसावले आणि योग्य ती कारवाई करण्याचा संदेशही दिला.
केशवराव देशपांडे आणि खासेराव जाधव हे महाराजांचे दोन्ही कलेक्टर राजद्रोही चळवळीच्या लोकांना संरक्षण देतात म्हणून महाराजांवर वरिष्ठ सत्ता नाराज होती. यातून महाराजांवर संकटे वाढू नयेत म्हणून केशवराव देशपांडे यांनी स्वतच नोकरीचा राजीनामा दिला. केशवरावांनी प्रामाणिकपणे राज्याची सेवा केल्याबद्दल सयाजीरावांनी त्यांना दहा हजार रुपये देऊन सेवामुक्त केले. दुसरे अधिकारी खासेराव यांनाही मुक्त करावे हा ब्रिटिश सरकारचा आग्रह मात्र महाराजांनी धुडकावून लावला. सयाजीरावांनी खासेरावांची दुसऱया खात्यात तात्पुरती बदली केली. दोन वर्षे वार्षिक पगारवाढ रोखण्याचे नाटकी आदेश काढले आणि थोडय़ाच दिवसांत सयाजीरावांनी हा निर्णय बदलला.
भारताच्या स्वातंत्र्य लढय़ात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱया महाराजा सयाजीराव आणि खासेरावांची जन्मभूमी महाराष्ट्र होती तर कर्मभूमी बडोदा होती. सयाजीरावांनी स्वातंत्र्य लढय़ासाठी दिलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या सहकार्याने खासेराव जाधवांनी अनेक क्रांतिकारकांना दिलेले पाठबळ तितकेच महत्त्वपूर्ण होते. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या ‘अज्ञात’ क्रांतिकारकांची नोंद घेणे अपरिहार्य ठरते.





























































