स्वतःचा मेकअप किट बनवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिवानी गोंडाळ, मेकअप आर्टिस्ट

स्वतःचा मेकअप किट कसा तयार कराल, कशी कराल सौंदर्य प्रसाधनांची निवड, त्यासार्ठी कोणती खबरदारी घ्याल याविषयी माहिती जाणून घेऊ या.

मेकअपसाठी लागणाऱया साहित्याची निवड करताना ती उच्च प्रतीचीच निवडावी. वस्तूचा दर्जा जेवढा चांगला तेवढाच मेकअप उत्तम प्रकारे करता येतो. मेकअपच्या प्रसाधनांमध्ये अनेक वेळा काही केमिकल वापरली जातात. त्यामुळे प्रसाधनांचा दर्जा कमी असल्यास त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो. रस्त्यावरची कमी किमतीची प्रसाधनं वापरल्याने त्वचा काळवंडणे, त्वचा शुष्क होणे असे अनेक प्रकार घडतात.

मेकअपचा दर्जा निवडतानाच पॅराबिन फ्री प्रसाधनांना प्राधान्य देणं जास्त चांगलं. सध्या बाजारात डुप्लिकेट उत्पादनांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळेही अनेक वेळा फसवणूक होते. अशा वेळेस चांगल्या दुकानातून खरेदी करणार असाल तरीही उत्पादनांची एक्सपायरी डेट तपासूनच वस्तू विकत घ्यावी. नवीन असाल तर नेहमीच्या प्रचलित कंपन्यांचीच उत्पादनं विकत घ्या. अनेक वेळा उत्पादनांची एक्सपायरी संपत आल्यास ती वस्तू कमी किमतीत विकली जाते. अशा वेळेस मोहाला बळी न पडता असे उत्पादन घेणे टाळावे. ऑनलाइन उत्पादन विकत घेताना अनेक वेळा अशी फसवणूक होते. अनेक वेळा चायनीज कंपन्यांची उत्पादनं ही कमी टिकणारी व कमी दर्जाची असतात.

ब्रँडेड उत्पादनं जर परकडत नसतील तर आपल्या देशातील उत्पादनेही चांगल्या दर्जाची मिळतात. नेहमीच मेकअप करून बाहेर पडायचं असल्यास अनेक वेळा माहीत नसतं की, नक्की काय वापरलं तर आपलं सौंदर्य जास्त खुलून दिसेल, नक्की काय वापरून आपण छान दिसू. तसेच अनेक क्रीम, उत्पादनं केव्हा कुठे आणि का वापरावीत, आपले स्वतःचे मेकअप किट कसे तयार करावे हे आपण पाहू या. काही क्रीम वापरूनही आपण छान दिसू शकतो, पण नेमकी कुठली क्रीम कशासाठी वापरावी माहीत नसतं. मेकअप करताना प्रथम सीटीएम करणे गरजेचे असते (क्लिनझिंग, टोनिंग, मॉइश्चराईझर ). आपण थोडक्यात काही क्रीमबद्दल माहिती करून घेऊ.

बीबी क्रीम – याला ब्युटी बाम किंवा ब्लेमिश बेस असं म्हणतात. यात मॉइश्चरायझर, सिरम, सनक्रीन, प्राइमर, फाऊंडेशन अशा सगळ्यांचे गुण असतात. त्यामुळे हे क्रीम लावल्यावर इतर काही लावण्याची गरज नसते.
सीसी क्रीम – ही त्वचेचा मुलायमपणा उजळ करतानाच स्किन टोन उजळ बनवते. या क्रीमला कलर करेक्टर किंवा कॉम्प्लेक्सन करेक्टरसुद्धा म्हणतात.
डीडी क्रीम – हे क्रीम ऍण्टीएजिंग असते. सुरकुत्या रोखण्याचं काम हे क्रीम करते.
सनक्रीन – उन्हामुळे त्वचेवर जो रापलेपणा येतो, तो दूर करण्याचे काम या क्रीम करतात. अनेक वेळा त्यामध्येच मॉइश्चरायझरही असते.
मॉइश्चरायझर – यामुळे त्वचा मुलायम राहते व त्वचेतील आर्दता राखण्यास मदत होते. त्वचेचे संरक्षक म्हणून हे क्रीम काम करते.

या नुसतं क्रीम लावून त्यावर स्किनला योग्य कॉम्पॅक्ट लावून तुम्ही नॉर्मल मेकअप करू शकता. अलीकडे क्रीम लावून त्यावर प्राइमर लावला जातो. त्यामुळे वरून फाऊंडेशन लावल्यास तो सुरळीतपणे पसरला जातो. सिलिकॉन बेस प्राइमर वापरणे जास्त चांगले. मात्र प्राइमर, फाऊंडेशनचा वापर खास ठिकाणी जाताना करावा व इतर वेळा क्रीम लावून त्यावर कॉम्पॅक्ट किंवा ट्रान्सलुसंट पावडर वापरावी.
पावडर किंवा फाऊंडेशनची निवड करताना
गोरा रंग – नॅचरल शेड घेणे
मध्यम गव्हाळ रंग – लाईट बेज (biege) शेड
सावळा रंग – बेज किंवा लाईट टॅन शेड
काळा किंवा डार्क रंग – टॅन किंवा ब्रोंझर शेड

वरीलपैकी एखादे क्रीम, फाऊंडेशन, कॉम्पॅक्ट पावडर, आय लायनर, काजळ, लिपस्टिक, आयब्रोपेन्सिल एवढं जरी तुमच्या किटमध्ये असलं तरी तुम्ही पटकन तयार होऊ शकता.