
सद्यःस्थितीत देशात ज्ञानवापीच्या मुद्दय़ावर चर्चा सुरू आहे. ही घटना इतिहासात घडली होती. आता हिंदू व मुस्लीम पक्षांनी अतिवादीपणा टाळला पाहिजे. मुस्लिमांनी न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे, तर हिंदूंनी दररोज नवी प्रकरणे काढणे टाळले पाहिजे. प्रत्येक मशिदीत शिकलिंगाचा शोध का घेता, या शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दोन्ही समाजांचे कान टोचले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा गुरुवारी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.
रेशीमबाग मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला भाग्यनगर येथील श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष दाजी उपाख्य कमलेशजी पटेल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. सरसंघचालक पुढे म्हणाले, आपल्या देशावर आक्रमण केल्यानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक असलेली अनेक मंदिरे तोडली. मुळात हिंदू समाजाच्या मनोबलाचे खच्चीकरण करण्याचा तो प्रयत्न होता. हिंदूंना काटते की आता अशा स्थानांचा पुनरुद्धार व्हायला हवा; परंतु आताचे मुस्लीम हे आपल्याच पूर्वजांचे वंशज आहेत. ज्ञानवापीच्या मुद्दय़ावर चर्चेतून मार्ग काढायला हवा.




























































