शिवसैनिकांनो सावध रहा, रात्र वैऱ्याची

69

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मित्रपक्षाकडून मतदार, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. मात्र अशा फसव्यांपासून शिवसैनिकांनी सावध राहून पक्ष संघटना मजबूत करून पक्षप्रमुखांचे विचार तळागाळात पोहचविण्याची जबाबदारी पार पाडली तर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त करून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, अशा सूचना केल्या.

संभाजीनगर ग्रामीण भागातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, ग्रामीण शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या आज शुक्रवारी तापडिया नाट्यगृहात आयोजित बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे हे प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, सहसंपर्कप्रमुख सुनीता आऊलवार, महिला आघाडी जिल्हा संघटक आनंदीताई अन्नदाते, रंजना कुलकर्णी, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना स्थापनेला ३३ वर्षे पूर्ण होत असून, अनेक शिवसैनिकांनी मोठ्या परिश्रमाने शिवसेना वाढविण्याचे काम केले. ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना नेहमीच अग्रेसर असून, पक्षाची ही भूमिका सर्वांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा शिवसैनिकांवर आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार स्वबळावर जिंकण्यासाठी सर्वांनी कामाला लागा, असेही खैरे म्हणाले.

वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने व प्रेरणेने निर्माण झालेले हे पक्ष संघटन अतिशय मजबूत आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता आपली जबाबदारी समजावून घेऊन कामाला लागले पाहिजे. संभाजीनगर शिवसेना शाखेचा येत्या ८ जून रोजी वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विभागप्रमुख ते शाखाप्रमुख व सरपंच आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले.

सिल्लोड नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मित्रपक्षाने दोन सदस्य पळवून नेले होते. मात्र त्यांच्या भूलथापांना बळी न पडता शिवसेनेच्या त्या सदस्यांनी एकनिष्ठ राहून शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवर फडकावला. त्यामुळे पक्षाने शिवसैनिकावर टाकलेला विश्वास हा कायम राहतो तो तसाच टिकवून ठेवा असा सल्ला जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना अग्रेसर आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळाली नाही. उसाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांची शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ ही पक्षसंघटनेद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही पदाधिकाऱ्यांची असून, ही जबाबदारी सर्वांनी पार पाडावी असे सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने म्हणाले. महिला आघाडी ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम पाहत आहे. महिला मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगण्याचे काम महिला आघाडीच्या पदाधिकारी करत असल्याचे मत महिला आघाडीच्या आनंदीताई अन्नदाते यांनी सांगितले.

या बैठकीचे सूत्रसंचालन उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, प्रास्ताविक वैजापूर तालुकाप्रमुख रमेश बोरणारे यांनी केले. शेवटी आभार राजू वरकड यांनी मानले.

आपली प्रतिक्रिया द्या