स्मशानभूमीत चोवीस तास काम करणाऱया कोरोना योद्धांचा शिवसेनेकडून सन्मान

कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, रुग्णालय कर्मचारी, पोलीस, सफाई कामगारांनी कोरोना योद्धा म्हणून उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे. पण त्यांच्याच खांद्याला खांदा लावून स्मशनभूमीत, कब्रस्तानमध्ये काम करणाऱया कामगारांनीही विनातक्रार चोवीस तास आपले कर्तव्य चोखपणे बजावले असले तरी त्यांच्या पाठीवर मात्र अद्याप कोणाचीच कौतुकाची थाप पडली नव्हती. त्याची दखल घेत शिवसेना दक्षिण मुंबई विभागाच्यावतीने आज त्यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आहे.

कारोना महामारीच्या सुरुवातीला एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तरी त्याच्याकडे प्रत्येकजण संशयाने पाहत होते, तर कोरोनाने मृत्यू झाल्यास संबंधिताचे नातेवाईकही अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नव्हते. या आणीबाणीच्या काळात स्मशानभूमीत काम करणाऱया कर्मचाऱयांनी कोणतीही भीती न बाळगता, आपल्या कुटुंबापासून दूर राहून अव्याहतपणे स्मशानभूमीतील आपली सर्व कर्तव्य बजावली आहेत.

त्या पार्श्वभूमीवर शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या पुढाकाराने आज कुंभारवाडा येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते स्मशानभूमीत काम करणाऱया कोरोना योद्धय़ांचा सन्मान केला. यावेळी खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजपुमार बाफना, उपनेत्या मीना कांबळी, युवसेना सचिव दुर्गा शिंदे-भोसले, विभाग संघटक जयश्री बळ्ळीकर आदी उपस्थित होते. दरम्यान, शिवसेनेने याआधी स्मशानभूमीतील कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या