
माणसे रोज मरतात.. मेली तर बिघडले कुठे? असे उद्दाम उद्गार काढणारे महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांना त्यांच्याच दालनात आज शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोंडून घेरले. तसेच पादचारी पुलावरून प्रसिद्धीची हौस भागवत महापालिकेत हंगामा करणाऱ्या डुंबरे यांची शिवसैनिक व नगरसेकांनी चांगलीच ‘हजेरी’ घेतली. शिवसेना स्टाईलने जाब विचारताच डुंबरे यांची तत..पप.. झाली. हिंमत असेल तर ठाणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले स्कायवॉकचे काम थांबवून दाखवा असे आव्हानच दिले.
वर्तकनगर येथील सिंघानिया शाळेसमोर नागरिकांच्या सोईसाठी स्कायवॉक बांधण्यात येत आहे. या कामासाठी स्थानिक नगरसेविका राधिका फाटक गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मंजुरी मिळून सदरचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र राजकीय स्टंट करीत भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली. तसेच निवडणुकीच्या तोंडावर फंड गोळा करण्याचे काम शिवसेना करीत आहे, असे बालिश वक्तव्यदेखील केले.
भाजपमध्ये आपले स्थान बळकट करण्याचा केविलवाणा प्रयत्न मनोहर डुंबरे करीत असून प्रसिद्धीची हौस भागवत आज त्यांनी आदळआपट करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही त्यांनी महापौर नरेश म्हस्के यांनी कोविडची लस घेतल्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. आता तर थेट मंजूर झालेल्या स्कायवॉकवरून अकलेचे तारे तोडले. अखेर शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक विकास रेपाळे, सिद्धार्थ ओवळेकर, मीनल संख्ये, विमल भोईर आदींनी डुंबरे यांना घेरले आणि जाब विचारला. शिवसैनिकांनी रौद्र रूप धारण करताच त्यांची बोलती बंद झाली.
तेव्हा तुम्हाला पार्टी फंड मिळाला होता का?
विकासकामे पक्षाला फंड मिळावा म्हणून होत असतील तर मनोहर डुंबरे यांच्या प्रभागात आजतागायत तुर्फेपाडा येथील तलावाचे सुशोभिकरण तीन वेळा कसे झाले? याचा खुलासा करावा असा सवाल शिवसैनिकांनी केला. त्यांच्या संस्थेला अन्नछत्राकरिता करोडो रुपयांची जागा मोफत दिली तेव्हा पार्टी फंड मिळाला होता का? असा जाबही विचारला. ही स्टंटबाजी शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा राधिका फाटक यांनी दिला आहे.

























































