महायुतीचे ठरले! जागावाटप झाले!! संयुक्त पत्रकाने केली घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना–भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीची घोषणा आज सायंकाळी एका संयुक्त पत्रकाद्वारे करण्यात आली. शिवसेना–भाजपासह रिपाइं, रासप, शिवसंग्राम व रयत क्रांती या महायुतीतील घटक पक्षांचे जागावाटपही सहमतीने पूर्ण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

राज्यात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना–भाजप महायुतीच्या घोषणेकडे राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी झालेल्या विविध मेळाव्यांमध्ये शिवसेना–भाजप महायुती 100 टक्के होणारच असा विश्वास व्यक्त केला होता. महायुतीचा निर्णय शिवसेना नेते सुभाष देसाई व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संयुक्त पत्रकाद्वारे जाहीर केला.

उद्धव ठाकरेंचे मार्गदर्शन, फडणवीसांचे नेतृत्व…

राज्यात गेली पाच वर्षे यशस्वीपणे राज्यकारभार करीत महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेण्याचे काम महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आणि आता लोकशाही परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मित्रपक्षांचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेअंती महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक ही महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यानुसार आम्ही महायुतीची घोषणा करीत आहोत असे संयुक्त पत्रकात नमूद केले आहे.

जनतेचा अभूतपूर्व आशीर्वाद

या महायुतीत कोणता पक्ष कोणत्या व किती जागा लढवणार इत्यादी तपशील लवकरच जाहीर केला जाईल. ही महायुती महाराष्ट्रामध्ये राज्यातील जनतेचा अभूतपूर्व आशीर्वाद प्राप्त करील हा विश्वास आम्ही व्यक्त करीत आहोत असे पत्रकात नमूद केले आहे.