विकासकामे केली नाहीत तर राजीनामा देईन, शिवसेनेच्या महिला उमेदवाराने बॉण्डवर लिहून दिले

राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. उमेदवार मतदारांना आश्वासन देताना दिसत आहेत, परंतु नांदेडमध्ये शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या नीता जैन यांनी मतदारांना केवळ आश्वासन दिले नाही तर चक्क बॉण्डवर लिहून दिले आहे. निवडून आल्यानंतर जर वर्षभरात विकासकामे केली नाहीत तर मी नगरसेवकपदाचा राजीनामा देईन, असे आश्वासन दिले आहे. नीता जैन यांनी घेतलेल्या या धाडसी भूमिकेचे सर्वत्र काwतुक होत आहे.

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवणाऱया शिवसेनेच्या उमेदवार नीता जैन यांनी प्रचारात पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत प्रभागातील मूलभूत नागरी समस्या सोडवण्यात त्या अपयशी ठरल्या, तर त्या आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देतील. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जातात. अनेक वेळा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होतो. अशा परिस्थितीत शासकीय बाँडवर लिहून दिलेले हे वचन केवळ शब्दांचे नाही, तर जबाबदारी स्वीकारण्याचे प्रतीक मानले जात आहे. नीता जैन यांच्या या पावलामुळे ‘काम न झाल्यास राजीनामा’ ही संकल्पनाच चर्चेत आली असून, मतदारांमध्ये त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आजवर अनेक उमेदवारांनी प्रचारादरम्यान मोठमोठी आश्वासने दिली, परंतु निवडणुकीनंतर त्याचा पाठपुरावा किती झाला, यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहिले. अशा पार्श्वभूमीवर नीता जैन यांचे हे लिखित आश्वासन मतदारांच्या नजरेत वेगळे ठरत आहे. प्रभाग क्रमांक 16 पुरतेच नव्हे, तर संपूर्ण नांदेड शहरात त्यांच्या या अनोख्या प्रचार पद्धतीची चर्चा सुरू आहे.

81 जागांसाठी 491 उमेदवार रिंगणात

या निवडणुकीत एकूण 81 जागांसाठी 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रीय पक्षांसह 14 प्रादेशिक पक्ष आणि विविध आघाडय़ांनीही आपली ताकद पणाला लावली आहे. स्थानिक प्रश्न, जातीय समीकरणे आणि विकासाच्या मुद्दय़ांवरून प्रचार अधिक आक्रमक होताना दिसत आहे.