
बागायत देऊळवाडा ते मसुरे गडनदी पात्रास जोडणारे सुमारे 5 किलोमीटर लांबीचे रमाई नदीपात्र गेली अनेक वर्षे गाळाने बुजून गेले होते. नदीपात्रातील गाळ उपसा काढण्यात यावा ही येथील ग्रामस्थांची गेल्या 25 हुन अधिक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून रमाई नदी पात्रातील गाळ उपसास सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती येथील जेष्ठ ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य अशोक मसुरकर यांनी दिली आहे.
रमाई नदीच्या पाण्यावर येथील अनेक एकर शेती अवलंबून असायची मात्र गेल्या काही वर्षात रमाई नदीचे पात्र गाळाने बुजत गेले. याचा परिणाम म्ह्णून पावसाळ्यात मोठा पूर येत शेती बाधित तर उन्हाळ्यात कोरडी स्थिती असे चित्र गेली काही वर्षे दिसून येत होते. नदी पात्रातील गाळ उपसा करण्यात यावा यासाठी येथील ग्रामस्थांनी मोठा संघर्ष केला. उपोषणाचा मार्गही अवलंबला. देऊळवाडा ग्रामपंचायततीने सातत्याने शासन स्तरावर पाठपुराव सुरू ठेवला. अखेर शासनाच्या माध्यमातून नदी पात्रातील गाळ उपसास प्रारंभ झाला असून ग्रामस्थ शेतकारी यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी सरपंच अदिती मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र सावंत, सदस्य अशोक मसुरकर, वर्षाराणी अभ्यंकर, चंद्रकांत राणे, दिलीप सावंत, तातू सावंत, राजेश चिंदरकर, नारायण परब, महेश बागवे आदी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. बच्चू प्रभुगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ झाला होता. गाळ उपासासाठी जलसंपदा विभागाला आवश्यक ते सर्व सहकार्य ग्रामस्थांच्या माध्यमातून केले जात आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनीही सुरू असलेल्या गाळ उपसा कामाची पाहणी करत पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण होण्यासाठी काही मदत लागल्यास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली. यावेळी मर्डे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच राजेश (पिंट्या) गावकर, दीपक आंगणे, प्रसाद आडवणकर आदी उपस्थित होते.
सद्यस्थितीत एक फोकलँड आणि एक डंपर या माध्यमातून काम सुरू आहे. मात्र अधिक मशनरी उपलब्ध झाल्यास पावसाळ्यापूर्वी अधिक गतिमान पद्धतीने काम होईल. तरी शासनाने याबाबत लक्ष घालावे अशी मागणीही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.























































