‘कोस्टल रोड’च्या सद्यस्थितीचा अहवाल ताबडतोब सादर करा! शिवसेनेसह सर्वपक्षीयांची मागणी

336
coastal-road-for-mumbai

पालिकेच्या महत्त्वाकांक्षी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाला सध्या न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगिती मिळाली असली तरी याबाबतच्या सद्यस्थितीचा अहवाल स्थायी समितीत तातडीने सादर करावा, अशी मागणी शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी  केली. पालिका प्रशासन कोस्टल रोडबाबत माहिती का देत नाही असा सवाल करीत सर्वपक्षीयांनी प्रशासनाला धारेवर धरले.

कोस्टल रोड प्रकल्पासाठी प्रमुख अभियंता, उपप्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या 22 हंगामी पदांच्या सातत्याबाबत स्थायी समितीत प्रस्ताव मांडण्यात आला, मात्र इतक्या मोठ्या प्रकल्पाबाबत पालिका प्रशासन सद्यस्थितीची माहिती का देत नाही असा सवाल सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला. याबाबत पालिका प्रशासनाला विचारणा केल्यास विधी खात्याचे अधिकारी दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येते. मात्र कोस्टल रोडचे काम कधी सुरू होणार याबाबत माहिती का दिली जात नाही असा सवालही त्यांनी केला. यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा, भापजचे प्रभाकर शिंदे, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनीदेखील प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. कोस्टल रोडच्या डिझाईनमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सपाचे रईस शेख यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला पुढील बैठकीत संपूर्ण माहिती, सद्यस्थिती सादर करावी असे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या