
कोटय़वधी रुपये खर्चून केलेले रस्ते दोन-तीन महिन्यांतच उखडून गेले आहेत. खड्डय़ांमुळे सर्वच रस्ते जीवघेणे झाले आहेत. याबाबत निवेदने देऊनही महापालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू आहे. त्यामुळे शहरातील खराब रस्ते प्रश्नावरून आज आक्रमक झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून प्रशासकांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘प्रशासक जवाब दो… चले जाव’चा नारा देत संतप्त शिवसैनिकांनी पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वारासमोरच पोलिसांनी अडविल्याने ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, प्रशासक तथा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याऐवजी शहर अभियंता रमेश मस्कर यांनी निवेदन स्वीकारून दोषी ठेकेदारांवर कारवाईचे लेखी आश्वासन दिले. उपनेते संजय पवार आणि जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
शहरातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक अपघातांसह अनेकांना हाडांचे विकार सुरू झाले आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे कोल्हापूरची नाहक बदनामी होत आहे. याला प्रशासक म्हणून आपला निष्काळजीपणाच जबाबदार आहे. शंभर कोटींच्या रस्त्यांबरोबरच कोटय़वधी रुपये शहरातील रस्त्यांसाठी खर्च केले जातात; पण हे पैसे कुठे मुरले जातात, हा प्रश्न आहे.
पेव्हर पद्धतीने रस्ते केल्यास त्याला तीन वर्षांची आणि हॉट मिक्स पद्धतीने केल्यास एक वर्षाची हमी असते. पण दुर्दैवाने कोणत्याही पद्धतीचे रस्ते केल्यास तीन महिनेसुद्धा रस्ते टिकत नसल्याचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे. याला आपण व संबंधित विभागाचे आपले सहकारी अधिकारी जबाबदार आहेत. एक महिला अधिकारी म्हणून आम्हाला तुमच्याबद्दल आदर व अभिमान आहे. पण आत्तापर्यंत कोल्हापूरकरांना तुम्ही कोणत्याही मूलभूत दर्जेदार सुविधा देण्यास असमर्थ ठरला आहात. त्याचबरोबर 86 लाखांचा ड्रेनेज घोटाळाही उघडकीस आल्यानंतर नेहमीप्रमाणे छोटय़ा माशांचा बळी दिला गेला. यातील मोठय़ा माशांचे पुढे काय झाले, याचे प्रशासक म्हणून उत्तर देणे कर्तव्य आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये आपण कोल्हापूरकरांना काय दिले, याचे चिंतन करणे गरजेचे आहे. म्हणूनच आज ‘जवाब दो…चले जाओ’ आंदोलन घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.