
सामना प्रतिनिधी | नवी मुंबई
तरुण पिढीला आगरी-कोळी संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी ऐरोलीतील दिवा-कोळीवाडा चौकात भव्य शिल्प उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. शिवसेनेने या निमित्ताने स्थानिक भूमिपुत्रांचा सन्मान केला असून हे शिल्प समाजबांधवांना प्रेरणादायी ठरणार आहे.
शिवसेना खासदार राजन विचारे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या निधीतून नगरसेवक चेतन नाईक यांनी ऐरोलीतील सेक्टर 9 मध्ये आगरी-कोळी शिल्प उभे केले. या उपक्रमांचा गौरव करीत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिल्पाचे लोकार्पण केले.
सेक्टर 3 येथील विरंगुळा केंद्राचे तसेच शिवसेनेचे संपर्क कार्यालय व सायकल ट्रकचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. लोकार्पणप्रसंगी बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी नेहमीच लढा दिला असून शेतकऱयांसाठी रान पेटवले आहे. यावेळी खासदार राजन विचारे, झोपडपट्टी सुधार मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते विजय नाहटा, आमदार रवींद्र फाटक, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, नगरसेवक एम.के.मढवी, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
शिवसेना शाखांचा सर्वसामान्यांना आधार
शिवसेनेच्या शाखांमधून पक्षांचे काम चालत असले तरी खऱया अर्थाने ही मदत केंद्रे असून सर्वसामान्यांना या शाखांचा मोठा आधार वाटत असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले. ते म्हणाले, शाखांमधून लोकांना न्याय दिला जातो. सर्व जाती-धर्मांचे नागरिक मदतीसाठी येतात. शाखांच्या माध्यमातूनच शिवसेनेची वचनपूर्ती होत असल्याने या शाखांना वेगळे महत्त्व आहे.





























































