चंद्रपूरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा; महिलांचा लक्षणीय सहभाग

3

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेने नगर परिषदेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला गडचांदुरमधील जनता हजारोंच्या संख्येत उपस्थित होती. नगरपरिषदेच्या अयोग्य कारभाराविरोधात जनतेने आक्रोश व्यक्त केला. या मोर्चाच्या प्रमुख मागण्या नगर परिषदेच्यावतीने मंजूर करण्यात आल्या.

77 लाभार्थ्यांच्या घरकूल यादीतील श्रीमंत लोकांची नावे वगळून गरजू लाभार्थ्यांना घरकुल वाटप करण्यात यावे, घरकुल वाटपात भेदभाव न करता लाभार्थ्यांना निकषाच्या आधारे त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीचे अवलोकन करून मौका चौकशी करून क्रम लावून प्राधान्य देण्यात यावे, पाणीपट्टी कर 1500 रुपये वरून 900 रुपये करावा,प्रभाग 3 मध्ये मंजूर असलेल्या पाणी टाकीचे काम जिल्हा परिषदेच्या जागेवर त्वरीत सुरू करावे, माणिकगड कंपनीच्या करामध्ये वाढ करावी, विकास निधीचे समांतर वाटप करण्यात यावे, मंजूर करण्यात आलेले 10 हातपंप नियोजित जागेवर बसवून पाणी समस्या दूर करावी, शिवाजी चौकाचे सौंदर्यीकरण करावे या प्रमुख मागण्यांसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा शहरातील गांधी चौक येथून नगरपरिषदेवर नेण्यात आला. तेथे मुख्याधिकारी विशाखा शेळके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रमुख मागणी 77 लाभार्थ्यांच्या मंजूर घरकुल यादीतील श्रीमंतांची नावे वगळावे ही होती.ती मागणी मान्य करण्यात आली आहे.

हा मोर्चा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नगरसेवक सचिन भोयर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख अक्षय गोरे, बबन उरकुडे, बालाजी मुंडे,माजी शहर प्रमुख राजू मूळे, आदिवासी सेनेचे तालुका प्रमुख पुरुषोत्तम मेश्राम, युवा सेनेचे शहर प्रमुख मयूर एकरे, किशोर बोबडे, विककी उरकुडे, नगरसेविका चंद्रभागा कोरवते, बालु माथुलकर, भारती मडावी, सुनंदा पुनवटकर, मनोज ईटनकर, दादाजी मोहुरले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.