धुळेकरांनो, भाजपला पाणी पाजा आणि पालिकेची सत्ता शिवसेनेकडे सोपवा – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे

धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री येथे ठाण मांडून बसले असून ते म्हणतात सत्ता दिलीत तर रस्ते, आरोग्य सुविधा, पाणी देणार! अशी वल्गना करणाऱ्या भाजपला या निवडणुकीत धुळेकरांनो पाणी पाजा आणि पालिकेची सत्ता शिवसेनेकडे सोपवा, शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी शिवसेनेच्या प्रचार सभेत केले.

धुळे शहरातील गल्ली क्रमांक 6 मध्ये सुभाष पुतळ्याजवळ शिवसेनेची जाहीर प्रचार सभा झाली. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील, माजी मंत्री बबन घोलप, आमदार किशोर पाटील, माजी आमदार कैलास पाटील, विजय रावराणे, नाशिक येथील सुधाकर बडगुजर, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, महिला आघाडीच्या प्रियांका घाणेकर, जिल्हा संपर्क प्रमुख के पी नाईक, सहसंपर्क प्रमुख सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, माजी आमदार शरद पाटील, विजय भट्टड, महेश मिस्त्राr यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सिंचन कामांचे नाव करून शिर्डी संस्थानकडून 500 कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दुर्दैवाने त्यातील बहुसंख्य पैसा यांच्याच सरबराईवर खर्च होणार आहे. सर्वसामान्य जनतेला सोयी-सुविधा देण्यासाठी भाजपच्या राज्यकर्त्यांकडे पैसे नाहीत. पण सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. यापूर्वीची 2014 ची निवडणूक भाजपने केवळ पैशांच्या बळावर जिंकली आहे, हे आता उघड सत्य आहे.

निवडणूक आली की, भाजपच्या नेत्यांना प्रभू रामचंद्रांचे स्मरण होते, असे स्पष्ट करीत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, अयोध्येत जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिले मंदिर, फिर सरकार, अशी घोषणा केली आहे. आज अयोध्येतील स्थिती पाहिली तर तेथे तिहारच्या तुरुंगासारखे वातावरण आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येतील तुरुंगात बंदिवान आहेत. प्रभू रामचंद्रांना अयोध्येतील बंदिस्त वातावरणातून मुक्त केल्याशिवाय शांत बसणार आहे. यानंतर आम्ही आता वाराणसी येथेही जाणार आहोत. हिंदुत्वाचा भगवा झेंडा या देशातल्या प्रत्येक शहरात शिवसेनाच फडकविणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केल्यानंतर पहिली निवडणूक धुळे महापालिकेची होत आहे. या महापालिकेवर भगवा ध्वज उंचावून पुढील टप्प्यात महाराष्ट्राच्या विधानसभेवर आणि राजधानी दिल्लीत भगवा ध्वज उंचावण्याची ताकद शिवसेनेला द्या, असे आवाहनही राऊत यांनी यावेळी केले. अयोध्येतील राममंदिराची आठवण करणारे भाजप नेते हे धुळ्यातील मंदिरे पाडली जात होती तेव्हा कुठे होते, असा प्रश्नही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

वाल्याचा वाल्मिकी करण्याचे काम भाजपने हाती घेतले
धुळे शहराचे भाजपचे आमदार अनिल गोटे हे भाजपमधील वाईट प्रवृत्तींशी संघर्ष करीत आहेत, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी वाल्याचा वाल्मिकी करण्याचे काम हाती घेतले आहे. गुन्हेगारांना स्वच्छ करण्याचे काम भाजप करीत आहे. त्यासाठी त्यांनी कोणते वॉशिंग मशीन आणले आहे याची विचारणा करा. गुंडगिरी शिवसेनाही करते. पण ती मुंबई आणि महाराष्ट्रासाठी. आज शिवसेना राहिली नसती तर मुंबई महाराष्ट्राची राहिली नसती. मुख्यमंत्र्यांची कोटी रुपये देण्याची थाप ही धुळे शहरातील शेवटची थाप ठरवा. महापालिकेता कारभार शिवसेनेकडे सोपवा. तो लोकहिताचाच होईल. महाराष्ट्राच्या सत्तेता मार्ग शिवसेनेसाठी खानदेशातून जावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत खासदार राऊत यांनी शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव पाटील, बबन घोलप, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांचीही भाषणे झाली. महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन यावेळी या नेत्यांनी केले.
नाशिक, जळगाव निवडणुकीत

पैशाचे आमिष दाखवून मते मिळवली
कल्याण-डोंबिवली, नाशिक, जळगाव महापालिकांच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी काही कोटी रुपये देईन, असे आश्वासन देत मते मिळविली. पण आज अखेर त्या-त्या शहरांना पैसेदेखील दिलेले नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की, पैसे देण्याची यांची लायकी राहिलेली नाही. राज्याची तिजोरी रिकामी आहे असे संजय राऊत यांनी सांगितले.

सत्तेसाठी मुख्यमंत्रीही धुळ्यात
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्र्यांना दैवीशक्ती प्राप्त झाली आहे. मग मुख्यमंत्री चमत्कार का घडवीत नाही, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, चमत्कार घडवून जनतेला सोयी-सुविधा द्या. दुष्काळाचे सावट दूर करा. राज्यात केंद्राची समिती दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आली आहे. अशावेळी मुख्यमंत्री मंत्रालयात हवे होते. दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या शेतकरी आणि सामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेण्याची वेळ असताना मुख्यमंत्री मात्र धुळे महापालिकेची सत्ता मिळावी म्हणून येथे आहेत, ही मोठी शोकांतिका आहे. मत आणि सत्तेसाठी केवळ दिशाभूल करण्याचे काम मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते करीत आहेत. भाजप नेत्यांनी हे लक्षात ठेवावे, खुर्ची ही बदलत असते. महापौरापासून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाची खुर्ची बदलते. येणाऱ्या काळात या सर्व खुर्चींवर शिवसेना असेल. शिवसेना केवळ आश्वासन देत नाही तर वचन देत असते. वचनाच्या पूर्ततेसाठी शिवसेना प्राण पणाला लावते.

राज्यात परिवर्तन होऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल
नाशिक – आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात निश्चितपणे परिवर्तन होईल, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, मंत्रिमंडळही शिवसेनेचेच असेल, असा विश्वास शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते खासदार संजय राऊत यांनी येथे व्यक्त केला. स्वबळाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडली आहे, त्यादृष्टीनेच आमची रचना सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक येथे शासकीय विश्रामगृहात खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेची स्वबळाची भूमिका राष्ट्रीय कार्यकारिणीत ठरली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हीच भूमिका वारंवार मांडली आहे. आमची संपूर्ण रचना त्यादृष्टीने सुरू आहे. आगामी निवडणुकीत परिवर्तन होईल, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, मंत्रीमंडळही आमचेच असेल, अशी आम्हाला खात्री आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र शिवसेनेला सत्तेचा मार्ग दाखवील, असे आशादायक वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले. युती होईल असे सांगणारे भाजपावाले शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत, असा टोलाही त्यांनी हाणला. 2014 साली तोडलेली युती आता 2019ला व्हावी, असे भाजपाला का वाटते, असा कोणता फरक झालाय की आता युती करण्याची दाट इच्छा होतेय, असेही त्यांनी भाजपाला सुनावले. चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा, या जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत या भाजपाच्या मंत्र्यांना मतदार पाहुण्यांकडेच बसवतील.

या पत्रकार परिषदेस जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे, सुनील पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, सुधाकर बडगुजर, भगवान भोगे, राहुल दराडे आदी हजर होते.

दैवी शक्ती आहे, तर सर्व प्रश्न सोडवा
‘सामना’च्या अग्रलेखात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा आरतीबाज असा उल्लेख केला होता, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या अंगी दैवी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या जोरावर ते अनेक निर्णय घेतात, विषय सोडवतात, असे विधान गिरीष महाजन यांनी केले होते. त्यावर आम्ही केलेलं विधान आहे की, हे आरती ओवाळणं बंद केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, दुष्काळ आहे. धुळ्यात आठ दिवसांनी एक ते दीड तास पाणी मिळते. स्वतः महाजनांच्या जामनेरमध्ये पंधरा-पंधरा दिवस लोकांना पाणी मिळत नाही, मग त्यांनी दैवी शक्तीच्या जोरावर दुष्काळ दूर केला पाहिजे. लोकांना अन्न, वस्त्र्, निवारा, पाणी दिले पाहिजे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली पाहिजे. निवडणुकाही लढू नका. तुम्ही पक्ष कार्यालयात एक दैवी शक्ती असलेला माणूस बसवा आणि राज्यातले सर्व प्रश्न सोडवा, असा टोलाही त्यांनी हाणला. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. गिरीष महाजन यांचे विधान त्या कायद्यांतर्गत येते. त्यावर कारवाई होवू शकते, म्हणून त्यांना आम्ही सावध केलंय, बाकी काही नाही, असेही ते म्हणाले. निदान मंत्र्यांनी तरी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची अशाप्रकारे आरती करू नये, असं आमचं म्हणणं असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या उद्रेकाची सरकारला भिती
महाराष्ट्रात केंद्रीय पथकाचा दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे. शेतकरी त्यांच्यासमोर वेदना मांडतायेत, ते आज ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडले आहे. दुष्काळाच्या अनेक घोषणा झाल्या, आमच्यापर्यंत काही पोहोचले नाही. कर्ज माफ झाले नाही. खरीपाची पिके गेली, त्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. आम्ही जगायचं कसं, आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी व्यथा करमाळ्याच्या जातेगाव येथील शेतकरी किसन वारे यांनी या पथकापुढे मांडली. निफाडच्या नैताळेतील शेतकरी संजय साठे याने मातीमोल भावात विकल्या गेलेल्या कांद्याच्या पैशांची मनीऑर्डर पंतप्रधानांना पाठविली. त्यालाच गुन्हेगार ठरविले जात आहे. हे दोन्हीही विषय महाराष्ट्रासाठी गंभीर व महत्त्वाचे आहेत. शेतकरी संतापलेला आहे, त्याचा उद्रेक झाला तर पथकाच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशी भिती सरकारला वाटतेय, म्हणून या पथकाला झेड प्लस सिक्युरिटी दिली आहे. बॉडीगार्ड घेवून हे पथक पाहणी करतंय. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची मानसिक अवस्था काय आहे, हे दाखविणारा हा प्रसंग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जानेवारीत उद्धव ठाकरे यांची गोदावरी तीरावर सभा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातील शरयू नदीवरील आरतीच्या नियोजनाची जबाबदारी नाशिकच्या शिवसेनेच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली. येत्या जानेवारीत उद्धव ठाकरे हे नाशिकला येणार आहेत. त्यांची येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा होईल. शरयूप्रमाणेच पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर कार्यक्रम घेण्यात येईल, त्याचीही तयारी सुरू असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

अयोध्येत जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिले मंदिर, फिर सरकार, अशी घोषणा केली आहे. आज अयोध्येतील स्थिती पाहिली तर तेथे तिहारच्या तुरुंगासारखे वातावरण आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येतील तुरुंगात बंदिवान आहेत. प्रभू रामचंद्रांना अयोध्येतील बंदिस्त वातावरणातून मुक्त केल्याशिवाय शांत बसणार आहे. यानंतर आम्ही आता वाराणसी येथेही जाणार आहोत. हिंदुत्वाचा भगवा झेंडा या देशातल्या प्रत्येक शहरात शिवसेनाच फडकविणार आहे.