ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाचे काम आठ वर्षांपासून लटकले; शिवसेना, मनसेने कागदी विमाने उडवत सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली

डोंबिवली शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाचे काम 8 वर्षे लटकले आहे. काम अर्धवट असल्याने वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. काम पूर्ण करण्याची एकही डेडलाइन प्रशासनाने पाळलेली नाही. त्यामुळे रखडलेल्या पुलाच्या निषेधार्थ आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुलावर एकत्र येत कागदी विमाने उडवत पालिका प्रशासन आणि शासनाच्या खोट्या आश्वासनाची खिल्ली उडवली.

ठाकुर्ली रेल्वे फाटकावरून सुरू झालेला पूल थेट म्हसोबा चौकात उतरण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. परंतु हा पूल अर्धवट आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवसेना शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे तसेच मनसेचे शहरप्रमुख प्रकाश भोईर आदींसह शेकडो शिवसैनिक आणि मनसैनिकांनी अर्धवट पुलावर एकत्र जमून सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा निषेध करत कागदी विमाने उडवत सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली.

कोपर उड्डाणपूल एकमेव पर्याय
ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद झाल्याने डोंबिवलीत पूर्व-पश्चिम वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. सध्या कोपर उड्डाणपूल हा एकमेव पर्याय असल्याने प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून कल्याणच्या दिशेने ठाकुर्ली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते.