
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ओजस्वी व ज्वलंत विचारांतून स्थापन झालेल्या व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे वाटचाल करत असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर रविवार, 18 जून रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे होणार आहे. या शिबिरात उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. सध्या राजकीय घडामोडींनी महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कोणता संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेतील बंडाळी, सत्तांतर आणि सद्यस्थितीतील अनागोंदी कारभार यामुळे राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्याकडे अपेक्षेने पाहत आहे. आगामी निवडणुकांमध्ये गद्दारांना धडा शिकवायचाच असा निर्धार जनतेने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर होणाऱया या शिबिराला एक वेगळेच महत्त्व आहे. या शिबिराच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या सत्रात आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे मार्गदर्शन होईल. शिबिराच्या दुसऱया सत्राची सुरुवात राहुल रानडे ग्रुपतर्फे ‘शिवसेनेचा पोवाडा’ या रंगतदार कार्यक्रमाने होईल. त्यानंतर शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाषणे होतील. सायंकाळी 4 वाजता शिबिराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 57 वा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात सोमवार, 19 जून रोजी षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या सोहळय़ासाठी राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे. वर्धापन दिन सोहळय़ाला उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
स्थळ – एनएससीआय डोम, वरळी
वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत




























































