
सामना प्रतिनिधी, नांदेड
दक्षिण मध्य रेल्वेच्या केंद्रीय विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे नाव डावलल्याच्या निषेधार्थ नांदेडच्या शिवसैनिकांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यालयासमोर आक्रमक निदर्शन केले.
दक्षिण मध्य रेल्वेच्या केंद्रीय विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि नांदेड उत्तरचे आमदार डी.पी.सावंत यांचे नावे प्रमुख अतिथी म्हणून छापण्यात आली होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिपत्याखाली हिंगोली हा जिल्हा ही येत असल्याने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे नाव प्रमुख अतिथी म्हणून असणे गरजेचे होते. तथापी हेमंत पाटील यांचे नाव त्या पत्रिकेतून वगळण्यात आले. याबाबत शिवसैनिकांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाशी संपर्क साधून त्यांना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे नाव पत्रिकेत नसल्याबद्दलचा संताप व्यक्त केला होता. तसेच अजूनही वेळ गेली नाही आता पत्रिकेत सुधारणा करता येईल असे शिवसैनिकांनी महाव्यवस्थापकांना सांगितले होते. परंतू महाव्यवस्थापकांनी दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ असूनही निमंत्रण पत्रिकेत दुरुस्ती करुन खासदार हेमंत पाटील यांचे नाव त्यात समाविष्ट केले नाही.
दक्षिण मध्य रेल्वेच्या या पक्षपाती आणि बेजबाबदार कृतीचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी आज दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यालयासमोर निदर्शन केले. तसेच यावेळी कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जात असलेल्या प्रमुख पाहुण्यांना शिवसैनिकांनी काळे झेंडेही दाखविले. काळे झेंडे दाखवून शिवसैनिकांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाविरुद्ध निषेधाच्या घोषणा दिल्या. दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही. शिवसैनिकांच्या या निदर्शनाचा धसका प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे कार्यालयाच्या दरवाजासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसैनिकांनी दिलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला.
उद्घाटनाचा कार्यक्रम अत्यंत नियोजनशून्य होता. आयआयटी मुंबईवरून केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीयाल यांनी नांदेडच्या इमारतीचे व्हिडीओव्दारा उद्घाटन केले. हे उद्घाटन होत असताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना ताटकळत ठेवण्यात आले. काहीवेळ तर काय होते आहे हेच कुणाला कुठेना, विद्यालयाच्या पोर्चमध्ये लावलेल्या स्क्रिनवरुन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यात येत होते. अखेर त्या स्क्रिनवर रमेश पोखरीयाल यांनी उद्घाटन केल्याचे जाहीर केले आणि तेथूनच कळ दाबून नांदेडच्या इमारतीतील नामफलकाचे उद्घाटन केले. ही निदर्शने जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, शहरप्रमुख तुलजेश यादव, नगरसेवक बालाजी कल्याणकर, माजी पं.स.सदस्य बालाजी कल्याणकर, बाळासाहेब उर्क बंडू देशमुख, महिला आघाडीच्या निकिता शहापूरवाड, दिपाली उदावंत यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.



























































