अलिबाग–पनवेल रेल्वे सेवा रोखण्याचा डाव हाणून पाडू! अलिबाग येथे शिवसेनेचा मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

शेकाप नेते, आमदार जयंत पाटील यांच्या पीएनपी या खासगी कंपनीला अथवा त्यांच्या बंदराला कोणत्याही परिस्थितीत आरसीएफच्या रेल्वे मार्गाची सायडिंग दिली जाणार नाही. तसा प्रयत्न करून अलिबाग-पनवेल रेल्वे सेवा रोखण्याचे मनसुबे आखाल तर हा डाव उधळून लावू, असा इशारा शिवसेनेने आरसीएफला दिला.

अलिबाग येथे शिवसेनेचा भव्य मेळावा झाला. यावेळी बोलताना शिवसेना नेते, खासदार अनंत गीते यांनी आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते पुढे म्हणाले, पीएनपी या खासगी कंपनीच्या प्रकल्प विस्तारामुळे अलिबाग-पेण-पनवेल ही रेल्वे सेवा रखडणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. आरसीएफ ही केंद्र शासनाची  सार्वजनिक उपक्रम कंपनी असून ती कोणत्याही खासगी कंपनी अथवा पोर्टसाठी स्थापन केलेली नाही. त्यामुळे आरसीएफने चुकीचे निर्णय घेऊ नयेत, जनतेच्या हिताच्या बाबी डावलून खासगी कंपनीचे लाड पुरवाल तर खबरदार. पीएनपी आणि आरसीएफमध्ये असा कोणता करार झाला असेल तर तो त्यांनी तत्काळ रद्द करावा, अन्यथा या कराराची चौकशी करून कठोर कारवाई करण्यास भाग पाडू, असा इशारा गीते यांनी दिला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस यांचे क्षेत्र फक्त पाच तालुक्यांपुरते राहिले असून ते ग्रामपंचायत निवडणुकीत पांढरे झेंडे घेऊन फिरत होते, अशी टीकाही त्यांनी केली.

12 तालुक्यांना अद्ययावत रुग्णवाहिका

जिह्यातील 12 तालुक्यांना 12 अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. 20 दिव्यांगांना इलेक्ट्रीक स्कूटरचे वाटप, कचरा गाडी, धनादेश तसेच ओपन जीमच्या साहित्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, संपर्कप्रमुख विलास चावरी, सदानंद थरवळ, सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख किशोर जैन, रवी मुंढे, रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, विजय कवळे, राजीव साबळे, युवासेनेचे योगेश कदम व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.