
सामना प्रतिनिधी, मुंबई
महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुंबईतील ‘रावण’ कदमवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा, अशी जोरदार मागणी आज पालिका सभागृहात शिवसेनेसह विरोधकांनी केली. भाजप आमदार राम कदम यांची हिंमत असेल तर महिलांना हात लावून दाखवावा, त्यांचे हात तोडू असा इशाराच यावेळी शिवसेनेने दिला. राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा भाजपनेही निषेध केला.
घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी ‘मुली पळवून आणून देऊ’ असे बेजबाबदार वक्तव्य केले होते. सोशल मीडियातून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून राम कदम यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पालिकेच्या महासभेतही आज विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी निवेदन करून महिलांबाबत बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांचा निषेध केला. यावर बोलताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीदेखील संबंधित पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ का करीत आहे, असा सवाल केला. शिवसेना अशा प्रवृत्तींना कधीही पाठीशी घालत नसल्याचे ते म्हणाले. हा सत्तेचा माज असल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंमत असेल तर महिलांना हात लावून दाखवा, शिवसेना तो हात तोडून टाकेल असा इशारा सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे यांनी दिला. भाजपने या ‘सडलेल्या’ कांद्याला ताबडतोब बाहेर काढावे, असेही ते म्हणाले.
…तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी घाटकोपर चिरागनगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीकडून आंदोलन सुरू आहे, मात्र अद्याप पोलिसांनी कदम यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. पोलीस सरकारच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी केला, मात्र जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. ‘राम कदम’ या वृत्तीविरोधात निषेध प्रस्ताव आणा अशी मागणी ‘सपा’चे रईस शेख यांनी केली. दरम्यान, राम कदम यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे भाजपचे गटनेते मनोज कोटकही म्हणाले.
summary- shivsena slams ram kadam over his controversial statement



























































