
सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर कारखान्याने प्रतिटन 2800पेक्षा जास्त भाव देण्याची घोषणा करूनही अक्कलकोट तालुका कारखाना लॉबी तयार करून शेतकऱयांना अपेक्षित भाव देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कारखानदारांची मुजोरी मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलन करण्यात येत आहे. प्रतिटन तीन हजार रुपये भाव मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱयांच्या उसाला वाढीव दरवाढ मिळावी यासाठी शिवसेनेकडून महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना साखर कारखाना प्रशासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱयांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे व्ही. पी. शुगर, तळवड येथे अक्कलकोट तालुकाप्रमुख आनंद बुक्कनुरे यांनी ऊस दरवाढीसाठी आमरण उपोषणाला सुरू केले आहे. जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होत आहेत. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, संतोष पेंगनाळकर, उपशहरप्रमुख राजू बिराजदार, युवासेनेचे शरण सुरवसे, विश्वनाथ कोगनुरे, सोपान नित्ते, मल्लिनाथ खुब्बा, स्वीमीराव मोरे, राजू गुणापुरे यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ते, शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवली आहे.


























































