भरमसाट वीज बिले मागे घ्या! शिवसेनेची अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘अदानी इलेक्ट्रिसिटी हाय हाय’, ‘ग्राहकांना लुटणाऱ्या अदानीचा धिक्कार असो’, ‘शिवसेना झिंदाबाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणा देत आज शिवसैनिकांनी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या टिळकनगर कार्यालयावर धडक दिली. निमित्त होते अदानी कंपनीने ग्राहकांना दिलेल्या अवाचेसवा वीज बिलाच्या निषेधार्थ शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या धडक मोर्चाचे. ग्राहकांना कशाच्या आधारे वाढीव वीज बिले पाठवली याचा जाब कुडाळकर यांनी प्रशासनाला विचारत ती तत्काळ मागे घ्या; अन्यथा तीक्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

अदानी इलेक्ट्रिसिटीने उपनगरातील वीज वितरण करणारी यंत्रणा रिलायन्सकडून खरेदी केल्यापासून ग्राहकांना वाढीव वीज बिले येत आहेत. वीज वापराचे रीडिंग न घेताच सरासरीच्या आधारे कुर्ला, नेहरूनगर, टिळकनगरमधील ग्राहकांना दिली आहेत. वीज बिल भरण्याची तारीख उलटून गेल्यानंतर अदानीकडून ग्राहकांना बिलांचे वितरण केले जात आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला ग्राहकांना 10-20 रुपयांच्या दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश कुडाळकर यांनी अदानीच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच दोन दिवसांत वाढीव बिले मागे घेण्याबाबत योग्य पावले उचलण्याबाबत निवेदन दिले. तसेच मुंबईमध्ये ग्राहकांना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांशिवाय अन्य भाषांमध्ये वीज बिले वितरित करू नयेत असेही बजावले.

यावेळी टरकलेल्या अधिकाऱयांनी सर्व मागण्यांवर दोन दिवसांत सकारात्मक पावले उचलण्याचे अश्वासन दिले. याप्रसंगी शिवसेनेच्या महिला विभाग सघटक संजना मुणगेकर, कुर्ला विधानसभा संघटक दिलीप शिंदे, सहसंघटक केसरी म्हात्रे, सहसमन्वयक संतोष साटम, महिला उपविभाग संघटक ममता परब, सुप्रिया शेलार, अमरावती संपर्कप्रमुख मधुरा देसाई, नगरसेविका प्रवीणा मोरजकर, शाखाप्रमुख दिलीप मोरे, बाबूराव मोरे, संजय कदम, केसरी धुरी, पंढरीनाथ आंबेडकर, कमलाकर बने, सुधीर भोसले, शाखा संघटक मेघना पाचकुडे, अश्विनी सातमकर, श्वेता संसारे, राजश्री पोटे, दीपा चव्हाण, भारतीय विद्यार्थी सेनेचे संतोष नाईक, युवासेनेचे रोहन पाटील आदी उपस्थित होते.

वितरण यंत्रणा सक्षम होईपर्यंत दंड आकारू नका
अदानी कंपनीने वीज वितरणाचा कारभार हातात घेतल्यापासून ग्राहकांना उशिरा वीज बिले मिळत आहेत. त्यामुळे बिल भरण्यासाठी गेलेल्यांना लेट फी म्हणून दहा-वीस रुपये जादा मोजावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आपली बिल वितरण यंत्रणा सक्षम होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा दंड आकारू नये, अशी मागणी आमदार मंगेश कुडाळकर यांनी केली. तसेच वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, एमईआरसीच्या निर्देशांचे पालन करा असेही बजावले.

मुंबईतील वीज कंपन्यांच्या बिल आकारणीची एमईआरसी करणार तपासणी
अदानी इलेक्ट्रिसिटीने ग्राहकांना पाठविलेल्या अवाचेसवा वीज बिलामुळे मुंबई शहरात आणि उपनगरात वीजपुरवठा करणाऱया सर्वच वीज कंपन्या ऐरणीवर आल्या आहेत. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी)मंजूर केलेल्या दरवाढीनुसारच ग्राहकांना वीज वापराची बिले दिली जात आहेत, की मागील अन्य चार्जेस लावले जात आहेत याची खातरजमा करण्यासाठी एमईआरसी त्यांच्या बिल आकारणीची तपासणी करणार आहे.

वीज आयोगाने 12 सप्टेंबर रोजी वीज दरवाढ करताना अदानी इलेक्ट्रिसिटी (रिलायन्स एनर्जी)ला सरासरी 0.24 टक्के दरवाढ मंजूर केली होती. मात्र कंपनीने रिलायन्सच्या काळातील इंधन अधिभाराच्या वसुली सुरू केल्याने ग्राहकांच्या वीज बिलात मोठी वाढ झाली आहे. याविरोधात ग्राहकांनी संताप व्यक्त करताच आयोगाने इतर चार्जेस मागे घेण्याचे निर्देश अदानी कंपनीला दिले. त्या पार्श्वभूमीवर बेस्ट, टाटा, आणि महावितरणकडून ग्राहकांच्या वीज बिलात मंजूर वीजदराशिवाय अन्य आकार लावले जात आहेत का, याची तपासणी केली जाणार असल्याचे एमईआरसीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.