
‘‘माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही,’’ असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.
‘‘शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व ‘मातोश्री’शी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरू ठेवणार आहे,’’ असे सुभाष देसाई यांनी आपल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे.

































































