
सामना ऑनलाईन. पणजी
खाण प्रश्नावर गप्प न बसता सर्वांनी एकत्र आंदोलन केलं पाहीजे, गरज पडली तर गोवा बंदची हाक दिली पाहीजे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या खाणग्रस्तांना पाठिंबा दिला. गेल्या 3 महिन्यापासून आझाद खाणग्रस्त धरणे आंदोलन करत आहेत. त्यांची शुक्रवारी राऊत यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यासोबत भेट घेतली.
”खाण ग्रस्तांना मदत करणे हे मतांचे राजकारण नाही.लाखो कुटुंबांच्या जगण्या मरणाचा प्रश्न आहे. यात कुठल्याच पक्षाने राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा विषय केंद सरकारसमोर मांडला पाहिजे. फक्त उपोषण आंदोलन करुन सरकारला जाग येणार नाही. यासाठी एक दिवस संपूर्ण गोवा बंद ठेवला पाहिजे” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सरकारने विचार केला तर 24 तासांच्या आत नवीन कायदा आणून खाणग्रस्तांचा प्रश्न सोडवू शकतात. पण सरकार तसे करताना दिसत नाही. या विषयावर राजकारण केले जात आहे असं ते पुढे म्हणाले
वेलिंगकर यांनीही यावेळी भाजप सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या ईगोमुळे आज गोव्यातील खाणी बंद झाल्या आहेत. गोव्यातील बेकायदेशीर खाणींबरोबर सर्व कायदेशीर खाणीही बंद करुन गोवा सरकारने गोव्यातील खाण अवलंबित कुटुंबांवर उपासमारीची पाळी आणली आहे असं वेलिंगकर यांचं म्हणणं आहे. खाण बंदी होऊन अनेक वर्षे उलटली तरी अजून टोलवाटोलवी सुरु आहे. त्यासाठी आता सगळय़ा कामगारांनी एकत्र ही सत्ता हाणून पाडली पाहिजे. सहनशीलतेची वेळ संपलेली आहे, असे वेलिंगकर म्हणाले खाणग्रस्त लोक संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहील्या तीन दिवसात नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर लाक्षणिक उपोषण करणार असून त्याला सर्व पक्षीय नेत्यांनी साथ देण्याचे ठरवले असल्याची माहिती कामगार नेते पुती गावकर यांनी दिली.लोकसभा निवडणुकांपुर्वी खाणी सुरु झाल्या नाहीत तर आमची साथ न दिलेल्या कोणालाही फिरकू देणार नाही असा इशारा देखील गावकर यांनी दिला आहे.































































