
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेता पण तुम्हाला गणपती विसर्जनाची साधी पद्धत माहिती नाही का, असा सवाल करत अंधारे यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे. धर्माच्या नावावर थयथयाट बंद करा, असा सल्लाही अंधारे यांनी राणांना दिला आहे. नवनीत राणा धर्माच्या नावावर वारंवार अवडंबर माजवत आहेत. त्यांना आरसा दाखवण्याची गरज असल्याचे अंधारे म्हणाल्या.
इतर धर्मियांकडून गणपती विसर्जनाची पद्धत चुकली असती तर नवनीत राणांनी कहर केला असता, असेही अंधारे यांनी सांगितले. आम्ही तुमच्यासारखे आक्रस्ताळेपणाने बोलत नाही, याचा अर्थ आम्हाला धर्म कळत नाही असा होत नाही. धर्म हा माणसाच्या सौख्यासाठी, समृद्धीसाठी आणि मानसिक उमेद कायम करण्यासाठी असतो. धर्माच्या नावावर माणसाची कोंडी करुन त्याचे जगणे मुश्कील करण्यासाठी धर्म नसतो, अशा शब्दांत अंधारे यांनी नवनीत राणांना सुनावले आहे.
याआधी तुम्ही हनुमान चालिसेसाठी थयथयाट केलात. मात्र आपल्याला हनुमान चालिसा म्हणता येत नाही. हनुमानाला हनुमान का म्हणतात याचेही नेमके कारण आपल्याला माहित नाही, असे म्हणत अंधारे यांनी राणा यांच्यावर टीका केली. गणपती विसर्जन करतानाचा नवनीत राणा यांच्या व्हिडीओ सध्या बराच व्हायरल होत आहे. गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन अनेक स्तरांतून राणा यांच्यावर टीका केली जात आहे. याच मुद्द्यावरून अंधारे यांनी राणा यांना फैलावर घेतले.


























































