
अस्मानी संकटातील बळीराजांच्या मदतीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धावली आहे. मुसळधार पावसाने मराठवाड्यात हाहाकार उडवला असून अनेक भागात भयंकर पुराने शेतातील जमीनच खरवडून नेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे लाखोंच्या पोशिंद्याची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेना नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील शेकडो शिवसैनिकांनी जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे ट्रक घेऊन धाराशीव गाठले आहे. संकटकाळात शिवसेनेच्या या मायेच्या ओलाव्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अक्षरशः अश्रू तरळले.
धाराशीवमधील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड
राज्यातील धाराशीव, सोलापूर या ठिकाणी पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. अतिवृष्टी आणि पुरात उभ्या पिकासोबत शेतातील मातीही खरवडून गेली आहे. यामुळे शेकडो एकर शेती बंजरच झाली असून भविष्यात पिके घ्यायची कशी, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांपुढे पडला आहे. अस्मानी संकटाच्या वरवंट्याखाली आलेल्या शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर ठाणे येथून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिक घावले आहेत.
लाखोंच्या पोशिंद्याच्या मागे शिवसेना ठाम
मराठवाड्यासह राज्यभरातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रत्यक्षात हाती मदत कधी मिळेल याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेने मैदानात उतरत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी वस्तू व अन्न-धान्याने भरलेले ट्रक पूरग्रस्तांच्या मदतीला पाठवले. त्यापाठोपाठ आज शिवसेना नेते राजन विचारे हे स्वतः अन्नधान्याने भरलेला ट्रक घेऊन धाराशीव जिल्ह्यात पोहोचले आहेत. लाखोंच्या पोशिंद्याच्या मागे शिवसेना सदैव उभी आहे असे राजन विचारे यांनी सांगितले. यावेळी संपर्कप्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रभाकर म्हात्रे, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, शहरप्रमुख अनिश गाढवे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय पथकही रवाना
पुरामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याची खबरदारी घेत राजन विचारे यांनी एक वैद्यकीय पथक आपल्यासोबत नेले आहे. हे पथक गावागावात फिरून नागरिकांची तपासणी करणार आहे.