अजित पवारांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची दातखिळी का बसते? संजय राऊत यांचा सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुद्द्यावर मौन का बाळगत आहे, असा सवाल केला. गेल्या काही वर्षात नैतिकतेचे अधःपतन झाले आहे. फडणवीस इतर मुद्द्यावर बोलत असतात, मात्र अजित पवार यांच्या महिला आयपीएस अधिकाऱ्यासोबत झालेला वाद, यावर का बोलत नाही, याबाबत बोलताना त्यांची दातखिळी का बसते? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या चार हस्तकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सरकारमध्ये बसून अजित पवार यांनी सरकारी हस्तक्षेप केला, तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, यात गैर काय आहे. याआधी असे चुकीचे काम करणाऱ्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता अजित पवार यांनी आयपीएस महिला अधिकाऱ्यांना मुरुम उत्खननाचे काम सांगितले होते. यात कोणते सार्वजनिक काम आहे, याची माहिती अजित पवार यांनी देण्याची गरज आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका मांडण्याचे गरज आहे, अशा विषयावर मुख्यमंत्र्यांची दातखिळी का बसते, असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपदही आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलणे गरजेचे आहे. त्यांनी सरकारमधील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पाठिशी घातले आहे, असे काम विरोधी पक्षाच्या नेत्याने केले असते, तर भाजपने उर बडवत रस्त्यावर आंदोलने केली असती, आता या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची दातखिळी का बसली आहे? असा सवालही त्यांनी केला.