
देशभरात आज महत्त्वाची दोन आमदोलने होणार आहेत, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी या आंदोलनाची माहिती दिली. तसेच ही आंदोलने महत्त्वाची आहेत, जनेतेमध्ये मतांबाबत जागृती करण्यासाठी दिल्लीतील आंदलन होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला लोकशाहीने दिला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग किंवा पोलीस आम्हाला अडवू शकत नाही, असेही त्यांनी ठणकावले.
आज दोन महत्त्वाची आंदोलने आहेत. महाराष्ट्रात सरकारविरोधात आणि भ्रष्ट मंत्र्याविरोधात शिवसेनेकडून जनआक्रोश आंदोलन होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच नवी दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सर्व खासदार आणि नेते संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
निवडणूक आयोग विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहे, सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यांमधले घोटाळे उघड होत आहेत, ईव्हीएमबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणूक आयोग सरकारचे हस्तक म्हणून काम करत आहेत. त्यासाठी आम्हांला प्रत्यक्ष जाऊन निवडणूक आयोगाला जाब विचारावा लागेल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रोज निवडणूक आयोगाची विविध प्रकरणे उघड करत आहेत. त्यामुळे जनजागृतीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. जनतेमध्ये आपल्या मताबाबत जागृती होण्याची गरज आहे. हा मोर्चा त्यासाठीच आहे, असे त्यांनी सांगितले.
किती खासदारांना भेटण्याची परवानगी दिली, हा प्रश्न नसून सर्व खासदारांनी एकत्र येत देशाचे लक्ष या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधण्याचा आहे. लोकशाहीने आम्हाला हा अधिकार दिला आहे. निवडणूक आयोग किंवा पोलीस आम्हाला अडवू शकत नाहीत. देशभरात काँग्रेसची सरकार असलेल्या ठिकाणी भाजपकडून आंदोलन होत आहेत. दिल्लीत भाजपकडून मोठ्या मोठ्या सभा, अधिवेशन आणि गोंधळाची कामे होत आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही आंदोलन करत असून तर त्याला रोखण्याचे कारण काय? ही इमर्जन्सी किंवा सेन्सॉर का आहे? लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरणारच, आम्हाला अटक करतील, आमची तयारी आहे, असेही त्यांनी ठणकावले.
राहुल गांधी पुरावे द्यावे, असे निवडणूक आयोग सांगत आहे, पुरावे द्यावे म्हणजे नेमके काय करावे, राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे. ते सत्य बोलत असून त्यांनी पुरावे समोर आणले आहेत. प्रत्येकवेळी त्यांना पुरावे देण्याची गरज काय? महाराष्ट्रात आम्ही पुरावे दिले, काय केले निवडणूक आयोगाने? असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. अमोल किर्तीकर यांची लोकसभेची जागा यांनी कशी चोरली, हे आमच्या समोर आहे. शिवसेना हे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने चोरून दुसऱ्या चोरांच्या हाती कसे दिले, हे आम्ही पाहिले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पुराव्याच्या गोष्टी सांगू नये. राहुल गांधी यांनी सर्व पुरावे दिले आहेत. तसेच हे सर्व पुरावे त्यांच्या वेबसाईटवरच आहेत. त्या आधारेच राहुल गांधी यांनी सादरीकरण केले आहे. निवडणूक आयोग हा भाजपचा हस्तक आणि प्रवक्ता आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.