
मिंधे आणि अजित पवार यांचा गट हा अमित शहा यांचा पक्ष असून ते दिल्लीत बसून पक्ष चालवत आहेत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबई गिळण्यासाठी दिल्लीतील काही व्यापाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना रोखण्यासाठी दोन पक्ष एकत्र आले, तर त्यात अयोग्य काहीच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गद्दारांसाठी भाजप घटनादुरुस्ती करून एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री बनवेल, असा जबरदस्त टोला त्यांनी भाजपला लगावला.
छगन भुजबळ अजित पवारांच्या गटात आहेत, मुळात तो पक्षच नाही, तो चोरलेला पक्ष आहे. त्या पक्षाचे प्रमुख अमित शहा असून ते दिल्लीत बसतात. अजित पवार किंवा मिंधे यांचा पक्ष नसून तो अमित शहा यांचा पक्ष आहे. आपल्याला मंत्री करण्यात अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे योगदान आहे, असे भुजबळ म्हणाले. यावरून तेदेखील मान्य करतात की, त्यांचा पक्ष हा अमित शहा यांचा पक्ष आहे. भाजपशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कितीही मर्द असला तरी कालांतराने त्याचा सरपटणारा प्राणी होतो, असा जबरदस्त टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, याबाबत विचारले असता ते म्हणाले, पडद्याआड चर्चा सुरू आहेत. योग्यवेळी पडदा उचलला जाईल आणि चित्र स्पष्ट होईल. या सर्व घडामोडींबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे बंधूनी एकत्र यावे, ही जनभावना असेल तर असे करायला हरकत नाही, असे आमचे सर्वांचे मत आहे. हा व्यापार किंवा व्यवहार नाही. ते भाजपत चालते. आमचा पक्ष राज्यातील जुना आणि मजबूत पक्ष आहे. आता एकत्र येण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल, इतरांनी त्याबाबत शक्यता वर्तवण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठी माणसाच्या कल्याणासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणूस एकत्र येत दिल्लीत बसलेल्या गुजराती व्यापाऱ्यांच्या छाताडावर बसला तरी ती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठी मानवंदना ठरेल. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला महाराष्ट्रात स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी एखादे पाऊल पुढे टाकण्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई हे मराठी माणसाचे हृदय आहे, मुंबई देशाची आर्थि राजधानी आहे. ही मुंबई गिळण्याचे अमित शहा, नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. अशावेळी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मराठी पक्षांनी एकत्र येण्याचे ठरवले, तर त्यात अयोग्य काहीच नाही, असेही ते म्हणाले.
एकेकाळी आम्ही भाजपसोबत असताना ते एकही उपमुख्यमंत्री करण्यास तयार नव्हते. आता दुसरा, तिसरा, पाचवा कितीही उपमुख्यमंत्री ते करू शकतात. ते गद्दारांसाठी घटनादुरुस्ती करून महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री करण्याची घटना ते तयार करू शकतात. त्यामुळे भाजपचे काही खरे दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.